कोल्हापूर : दुचाकीस्वार गायत्री पटेलने कोल्हापुरातून शनिवारपासून वन ड्रीम वन राइड उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरुवात केली. टीव्हीएस अपाचे २०० आरटी या दुचाकीवरून पुढील सहा महिन्यांत गायत्री तीस हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर या मोहिमेत पूर्ण करेल. माई टीव्हीएसमध्ये कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मोहिमेची सुरुवात झाली.यावेळी आमदार पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांनी गायत्रीला सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. एकतीस वर्षीय गायत्री व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. भारतात अनेक महिला दुचाकीवरून मोहिमा करताना तिने वाचले व पाहिले होते. आपणही अशा प्रकारे काही वेगळं करावे असे गायत्रीने ठरवले आणि २०१७ पासून गायत्रीने दुचाकीवरील प्रवासाला सुरुवात केली. आजअखेर गायत्रीने देशाच्या वेगवेगळ्या भागात टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० या दुचाकीवरून ६५ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.२८ राज्ये.. १८ जागतिक वारसा स्थळे..वन ड्रीम वन राइड मोहिमेत गायत्री भारतातील अठ्ठावीस राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठरा जागतिक वारसा स्थळांना भेटी देणार आहे. ही मोहीम जून २०२१ पर्यंत पूर्ण होईल.
महिलांमध्ये प्रवासाची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक स्त्रियांनी अशा मोहिमा राबवाव्यात यासाठीच मी ही मोहीम करत आहे.- गायत्री पटेल