‘इंचनाळ’ला देवाची जमीन विकण्याचा घाट !--‘इंचनाळ गणपती’च्या जमिनीची कुळकथा
By Admin | Published: September 22, 2015 09:19 PM2015-09-22T21:19:25+5:302015-09-22T23:52:46+5:30
प्राचीन गणेश मंदिर : ग्रामस्थांसह गणेशभक्तांचा विरोध, देवस्थानची मालकी अबाधित ठेवण्याची मागणी
राम मगदूम- गडहिंग्लज --इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील प्राचीन श्री स्वयंभू गणेशाची पूजा-अर्चा आणि देखभालीसाठी इनाम मिळालेली सहा एकर २९ गुंठे बागायती देवस्थान शेतजमीन वहिवाटदाराने आपल्या प्रापंचिक कारणासाठी गावातील एका बड्या पुढाऱ्यास बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास ग्रामस्थांसह समस्त गणेशभक्तांचा विरोध आहे. कोट्यवधी रुपयांची ही जमीन देवस्थानच्याच मालकीची रहावी, यासाठी नव्याने संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर गणपती देवाच्या जमिनीची कुळकथा आजपासून...
तत्कालीन राजे-महाराजांकडून अनेक वर्षांपूर्वी श्री गणपती देवाची पूजा-अर्चा, अन्य धार्मिक विधी आणि देखभालीसाठी इनाम मिळालेली तब्बल ६ एकर २९ गुंठे इतकी बागायती शेतजमीन संबंधित वहिवाटदाराने आपल्या प्रापंचिक कारणासाठी विकण्याचा घाट घातला आहे. परंतु, काही जागरूक ग्रामस्थ, गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे या प्रकरणास वाचा फुटली आहे.इंचनाळ गावच्या हद्दीत पूर्वीचा रि.स.नं. ६१ व ६२/१ आणि चालू गट नंबर २७३/१अ व २७३/१ ब या जमिनी ‘श्री गणपती देव’ या देवस्थानच्या मालकीच्या आहेत. ही जमीन पूर्वी बाळकृष्ण गोपाळ भट-जोशी हे कसत होते. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गजानन यांच्याकडे ही जमीन वहिवाटीस आली. मात्र, शिक्षकी पेशामुळे ते नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत.
१९५९ मध्ये गजानन यांनी आपला भाऊ मनोहर यांना या जमिनीसंदर्भातील वटमुखत्यारपत्र करून दिले. मात्र, मनोहर हेदेखील बाहेर गावी राहत. त्यामुळे देवाची पूजा-अर्चा व देखभालीचे काम शिवराम गोपाळ जोशी-दंडगे हे करीत. त्यांच्या पश्चात त्यांची मुले विश्वनाथ, वसंत व सुभाष यांच्याकडे पूजा आली. सध्या वसंत व सुभाष हेच पूजा-अर्चा करतात. दरम्यान, या जमिनीच्या वहिवाटीवरून वसंत जोशी व गजानन जोशी यांच्यात वाद निर्माण झाले. त्यामुळे वसंत यांनी गजानन यांच्याविरुद्ध धर्मादाय आयुक्त यांच्या कोर्टात दावा दाखल केला.
बेकायदेशीर वटमुखत्यारपत्र
श्री गणपती देव आणि देवस्थानची शेतजमीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित येते. त्याची रितसर नोंद धर्मादाय आयुक्तांच्या दफ्तरी आहे. त्यानुसार जमिनीसंंबंधीचे सर्वाधिकार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीलाच आहेत. त्यामुळे ‘गजानन’ यांनी ‘मनोहर’ यांना करून दिलेले वटमुखत्यारपत्र आणि या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहारदेखील बेकायदेशीरच आहे, असे ग्रामस्थ आणि गणेशभक्तांचे म्हणणे आहे.
श्री गणपती देवाची ही शेतजमीन सुरूवातीस भैरू रामा भोसले, बंडू रामा भोसले व धोंडी रामा भोसले हे कसत होते. त्यानंतर गणपतराव बाळोजी देसाई, गणपती दौलू पाटील, दत्तात्रय संतू पाटील, दत्तात्रय संतराम नांदवडे व विठ्ठल लक्ष्मण पालकर हे कसत. त्यानंतर बाळकू भीमा पोवार, अनिलकुमार राजाराम दड्डीकर व आनंदा बाबू जाधव हे कसत. त्यानंतर मनोहर जोशी यांच्या संचकारपत्रानुसार ही जमीन आनंदराव धोंडीबा पोवार यांच्याकडे असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
वरिष्ठांकडे मागितली दाद --यासंदर्भात पंचक्रोशीतील गणेशभक्तांसह ग्रामस्थांनी गडहिंग्लजचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. तद्वतच जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडेही त्यांनी दाद मागितली आहे.
पेशवेकालीन गणेश मंदिर
प्राचीन गणेश मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवाईत झाला. त्यामुळे पेशवकालीन गणेश मंदिर म्हणूनही ‘इंचनाळ’चा गणपती प्रसिद्ध आहे. लोकवर्गणीतून सुमारे ८.५० लाख खर्चून मंदिराचे बांधकाम झाले आहे. देवस्थानची जमीन १० एकर असली तरी ‘श्रीं’चा दैनंदिन विधी व वर्षभरातील कार्यक्रम देणगीतूनच होतात. त्यामुळेच या जमिनीचे उत्पन्न देवस्थानला मिळावे आणि जमिनीवरील ‘देवाची मालकी’ अबाधित रहावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.