कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चौदा अल्पवयीन मुलींची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी दिली. त्यांना शिवाजी विद्यापीठातील डीओटी कोविड केंद्रात अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तिवले यांनी सोमवारी तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली.
संस्थेतील शून्य ते अठरा वयोगटातील १२६ मुला-मुलींची व २९ कर्मचाऱ्यांची सोमवारी कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल दोन दिवसांत येईल, असे सांगण्यात आले. कोरोना सुरू झाल्यापासूनच संस्थेने मुला-मुलींची काळजी घेतली आहे. परंतु पोलीस खात्याकडून दाखल होणाऱ्या मुले-मुली संस्थेत आल्यावर त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. आताही ज्या मुली पॉझिटिव्ह आल्या त्या अशाच संसर्गातून आल्या आहेत. संस्थेतील सर्व मुलांसाठी लागणारे धान्य व इतर जीवनावश्यक साहित्य संस्थेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अन्नधान्याची कोणतीच कमतरता नाही. फक्त सद्यस्थितीत या मुलांना कोराना संसर्गापासून वाचवणे हेच आमच्यासमोरील मुख्य काम असल्याचे तिवले यांनी सांगितले.