ऊसतोडणीला मजूर द्या...एक महिन्याचे काम देतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:07 AM2018-03-12T00:07:08+5:302018-03-12T00:07:08+5:30
आयुब मुल्ला ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या कारखान्याला मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा शेती विभाग प्रयत्न करू लागला. मजूर द्या किमान एक महिना उसतोडणीचे काम दिले जाईल, असे आवाहन यानिमित्ताने अनेक कारखान्यांच्या वतीने केले जात आहे. यास प्रतिसादही मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन चार महिने संपले. अजून किमान बहुतांश कारखाने एक महिना चालतील, अशी स्थिती आहे. गळीत हंगाम सुरु झाल्यापासून प्रत्येक कारखान्याला ऊसतोडणी मजूर व वाहतुकीच्या समस्येचे ग्रहण लागले आहे. किमान प्रत्येक कारखान्याला पंचवीस टक्के तोडणी मजूर यंत्रणेचा कमतरतेचा फटका बसला. त्यामुळे प्रतिदिन ऊस गाळपक्षमता घटली. याचा एकूणच सर्व संबंधित घटकांवर परिणाम होत गेला.
यंत्रणा आता मिळू लागली आहे. बैलगाडी, अंगत, ट्रॅक्टर, ऊसतोडणी यंत्रे मजुरासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यावर दाखल होत आहे. त्यामुळे किमान शेवटच्या टप्प्यातील कार्यक्षमता टिकण्यास मदत होणार आहे.
या दिवसांत अपेक्षित वेळेत जो ऊस जाणे गरजेचे असे वाटते तो आता नक्की जाईल. याचा फायदा शेतकºयांना जास्त होणार आहे. कारखान्यांना ही बाब पूरक ठरणार आहे. याच बरोबर मजूर आणि वाहतूकदारांचाही फायदा होणार आहे.
कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. सुमारे दहा फेब्रुवारीपासून फेब्रुवारी अखेरपर्यंत बहुतेक कारखाने बंद झाले. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सुमारे वीस कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्याकडे असणारी यंत्रणा मिळविण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने प्रयत्न करीत हो ते. त्यास यश येताना सध्या दिसत आहे.
२० टक्के मजूर कमी
कर्नाटकातील कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाण्यापेक्षा किमान तीन आठवडे अगोदर सुरू झाले. तेथेही मजूर कमतरतेचा प्रश्न भेडसावलाच. मजुरांची ही कमतरता सगळीकडेच भेड सावली आहे. सोलापूर, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या भागातूनच मजूर जास्त येतात. परंतु गत मान्सूनमध्ये तसेच परतीचा पाऊस तेथे चांगला झाला. त्यामुळे शेती मशागती साठी अनेक मजूर तेथेच थांबले. तसेच त्या भागातील कारखानेही जोमात सुरू झाल्याने लांब जाण्यापेक्षा परिसरातच ऊस तोडणीला प्राधान्य मजुरांनी दिले.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात तसेच अन्य ठिकाणीही उसतोडमजुर जवळपास अपेक्षेपेक्षा वीस टक्के कमी आले.
आता ऊस तोडणी मजूर मिळू लागल्याने कारखाने बºयापैकी गाळप क्षमतेने चालतील असे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश कारखान्यांना अशाप्रकारे पंधरा टक्के यंत्रणा मिळाली आहे. ज्या ज्या कारखान्यांनी प्रयत्न केले, त्यांना मजूर मिळविण्यासाठी यश मिळत आहे. यासाठी कमिशन वाढ मिळावी तसेच जाण्या-येण्यापैकी एक प्रवास खर्च मिळावा, अशी तोडणी वाहतूकदारांनी मागणी केली असून, त्यास काहीसा प्रतिसादही कारखान्याकडून दिला असल्याचे समजते.