सतीश पाटील यांना ‘स्वीकृत संचालक’पद द्या..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:34+5:302021-05-06T04:26:34+5:30
राम मगदूम (गडहिंग्लज) निवडून येण्याची क्षमता असतानादेखील उमेदवारी नाकारल्यानंतरही विरोधी आघाडीच्या विजयासाठी अहोरात्र झटलेले राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते जि.प. उपाध्यक्ष ...
राम मगदूम (गडहिंग्लज)
निवडून येण्याची क्षमता असतानादेखील उमेदवारी नाकारल्यानंतरही विरोधी आघाडीच्या विजयासाठी अहोरात्र झटलेले राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांना गोकुळ दूध संघावर ‘स्वीकृत संचालक’ म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी येथील कार्यकर्त्यांसह गडहिंग्लज विभागातील दूध संस्था पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीतदेखील सत्तारूढ आणि विरोधी या दोन्ही आघाड्यांकडून प्रत्येकी ४ प्रमाणे एकूण ८ जणांना उमेदवारी मिळाली; परंतु महिला राखीव गटातून विरोधी आघाडीकडून लढलेल्या अंजना रेडेकर वगळता उर्वरित सर्वच उमेदवारांचा ‘क्रॉस व्होटिंग’मुळे पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर तीन तालुक्यांतील दूध संस्थांना न्याय देण्यासाठी धडाडीच्या कार्यकर्त्याला ‘स्वीकृत संचालक’ म्हणून संधी देण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेच सतीश पाटील यांचे नाव पुढे आले आहे.
गिजवणेचे उपसरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या पाटील यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावरच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मारली. गडहिंग्लज पंचायत समिती सदस्य आणि गडहिंग्लज अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
चौकट १.
पक्षवाढीसाठी मदत होणार..! राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या आकस्मिक निधनानंतर तिन्ही तालुक्यांशी समन्वय ठेवून पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटनेसाठी पूर्णवेळ देणाऱ्या सतीश पाटील यांना ‘गोकुळ’वर स्वीकृत संचालक म्हणून संधी दिल्यास त्याचा पक्षवाढीसाठीही फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे.