कोरोनाबरोबरच आता विकास योजनांनाही प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:39+5:302021-06-30T04:16:39+5:30
कोल्हापूर : कोरोना एका दिवसात संपणार नाही. तेव्हा अन्य विकासकामांमध्येही लक्ष घाला. योजना यशस्वी ...
कोल्हापूर : कोरोना एका दिवसात संपणार नाही. तेव्हा अन्य विकासकामांमध्येही लक्ष घाला. योजना यशस्वी करताना उद्दिष्टपूर्तीसाठी आग्रही राहा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी विभागप्रमुख आणि बारा गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.
चव्हाण यांनी ऑनलाईन बैठकीपेक्षा मंगळवारी सकाळी सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बैठकीला बोलावून या सूचना दिल्या. स्वच्छ भारत कार्यक्रम, जलजीवनमिशन, पंचगंगा प्रदूषण, पंधरावा वित्त आयोग निधी यासह विविध विभागांच्या योजनांचा आढावा घेतला. तालुका पातळीवर नोंदणी करण्यासाठी एकच नंबर दिल्याने कोरोना रुग्णांची माहिती भरण्यास विलंब होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आयसीएमआर संस्थेच्या संबंधितांशी बोलून हे नंबर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
चव्हाण म्हणाले, गेल्या वर्षीपासून आपण सर्वजण कोरोनाशी लढत आहोत. परंतु तो एका दिवसात संपणारा नाही हे स्पष्ट आहे. त्याच्याशी लढताना आता बाकीची कामे बाजुला ठेवून चालणार नाही. त्यामुळेच शासनाच्या विविध योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना यशस्वी करण्यासाठी कार्यरत रहा. जिल्ह्यात १२७ कोरोनामुक्त गावे असून त्या गावातील दहावी, बारावीबरोबरच प्राथमिक शाळा कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून सुरू करता येतील याची स्थानिक पातळीवर चर्चा करा. जे घटक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बोलावून शिकवले पाहिजेत अशा वेळी वेळा बदलून नियोजन करा.
चौकट
व्याधीग्रस्त मुलांच्या पालकांचे लसीकरण
जिल्ह्यात १०९६ व्याधीग्रस्त विद्यार्थी असल्याचे याआधीच्या शालेय आरोग्य तपासणीत आढळून आले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये या मुलांना दुर्देैवाने लागण झाली तर त्यांच्यासमवेत त्यांच्या पालकांना रुग्णालयात रहावे लागणार आहे. त्यामुळे या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.
चौकट
वित्त आयोगाचा निधी खर्च करा..
बैठकीदरम्यानच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हीसीद्वारे जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नसल्याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दोनच दिवसात याबाबत पर्याय काढून दिला आहे. तेव्हा निधी शिल्लक राहणार नाही. उलट प्रोत्साहनात्मक अनुदान जास्त कसे मिळेल यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले.