जिल्हाध्यक्षांच्या पत्राला किंमत द्या, निधीही द्या; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
By समीर देशपांडे | Published: November 27, 2024 04:29 PM2024-11-27T16:29:29+5:302024-11-27T16:30:50+5:30
मुंबईतील बैठकीत अनेकांनी मांडल्या व्यथा
समीर देशपांडे
कोल्हापूर : विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. सत्तेत आलो आहोत. अजून बाकीच्या निवडणुका बाकी आहेत. या सगळ्यांमध्ये जिल्हाध्यक्षांनी प्रचंड परिश्रम केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्राला किंमत द्या आणि विकासकामांसाठी निधीही द्या, अशी आग्रही मागणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत अनेक जिल्हाध्यक्षांनी आपल्या व्यथा मांडल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सरचिटणीस विक्रांत पाटील, विजय चौधरी, माधवी नाईक हे प्रमुख प्रदेश पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेेले भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या करताना वस्तुस्थितीही मांडली. या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असे, संघटनेचे दैनंदिन कामकाज आम्ही चालवत असतो. राेजची आंदोलने, कार्यक्रम, आगत-स्वागत हे सर्व करण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष पार पाडत असतो. प्रचाराच्या नियोजनापासून मोठ्या सभांच्या आयोजनापर्यंत सर्व जबाबदारी त्याच्याकडे असते; परंतु निवडणुकीनंतर अनेकदा जिल्हाध्यक्षांना अडगळीत टाकले जाते, अशी व्यथा काही जिल्हाध्यक्षांनी यावेळी मांडली.
अनेकदा गाव, वॉर्ड पातळ्यांवरील कार्यकर्त्याला आमदार, खासदार ओळखत नाहीत; परंतु त्याला जिल्हाध्यक्ष ओळखत असतो. त्याला तो कामाला लावत असतो. परंतु त्याचे काम करायचे झाले तर मात्र ते जिल्हाध्यक्ष करू शकत नाही. जिल्हाध्यक्षाच्या पत्राला अशा वेळी किंमत मिळाली पाहिजे. विकासकामांसाठी काही निधीही जिल्हाध्यक्षांच्या पत्रानुसार दिला पाहिजे, अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
अनेक जिल्ह्यांमध्ये प्रमुख नेत्यांच्या आसपास असणाऱ्या ठरावीक मंडळींची महामंडळे आणि समित्यांवर नियुक्ती केली जाते; परंतु यापुढील काळात अशा नियुक्त्या करताना जिल्हाध्यक्षांना प्राधान्य देण्यात यावे. याआधी ज्यांना पदे देण्यात आली आहेत, त्यापेक्षा इतरांना संधी द्यावी, अशीही मागणी काहींनी केली.
मंत्रालयात येण्यासाठी पास द्या
एका जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आमच्या जिवावर आमदार झालेली व्यक्ती चार कंत्राटदारांचे पास काढून आमच्यासमोर मंत्रालयात जाते. आम्ही मात्र पासच्या रांगेत उभे असतो. हे चित्र बदलले पाहिजे. किमान मंत्रालयात येण्यासाठी तरी आम्हांला पास द्या, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्यांची दखल घेण्याची ग्वाही यावेळी बावनकुळे यांनी दिली.