वडणगे : करवीर तालुक्यातील वडणगे गावचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत समावेश न करता स्वतंत्र क वर्ग नगर परिषदेचा दर्जा मिळावा अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडे हद्दवाढीबाबत सादर केलेल्या प्रस्तावात वडणगेचा समावेश आहे. मात्र, हा प्रस्ताव भौगोलिकदृष्ट्या चुकीचा आहे. पावसाळ्यात पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे येथील ६० टक्के क्षेत्र पाण्याखाली जाते. गावातील अनेक कुटुंबे शेतीवर आधारित आहेत. हद्दवाढ झाल्यास शेती व्यवसायाला धोका निर्माण होणार आहे, तसेच महापालिकेची भविष्यात होणारी करवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. गावातील विविध संस्था, तरुण मंडळे, ग्रामस्थांच्या मागणीवरून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे वडणगे ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर होण्याबाबतचा प्रस्ताव करण्याचे एकमताने ठरले आहे. ग्रामस्थांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून हद्दवाढीला विरोध केला आहे. महापालिका हद्दीतील उपनगरे अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे नव्याने होणाऱ्या हद्दवाढीतील गावांना सुविधा मिळणे शक्य नाही असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, बाजीराव पाटील, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, उपसरपंच सयाजीराव घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, सूरज पाटील, सुनील पोवार, महालिंग लांडगे, सरदार मिसाळ आदी उपस्थित होते.
फोटो : १३ वडणगे निवेदन.
ओळी : वडणगेचा हद्दवाढीमध्ये समावेश न करता स्वतंत्र क वर्ग नगर परिषदेचा दर्जा मिळावा या मागणीचे निवेदन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे देताना माजी आमदार चंद्रदीप नरके. यावेळी बाजीराव पाटील, इंद्रजित पाटील, सयाजी घोरपडे, सतीश पाटील, सूरज पाटील, सरदार मिसाळ, सुनील पोवार, महालिंग लांडगे उपस्थित होते.