पुष्पवृष्टीने गोकर्ण पर्तगाळी मठाधीशांचे कोल्हापुरात स्वागत
By संदीप आडनाईक | Published: April 6, 2024 08:34 PM2024-04-06T20:34:08+5:302024-04-06T20:34:46+5:30
तप्तमुद्राधारण सोहळा, प्रवचन, भजनाचे आयोजन
कोल्हापूर : तुतारीच्या निनादात आणि मशालीच्या उजेडात पुष्पवृष्टी करत पंचाआरतीने ओवाळून पर्तगाळी गोवा येथील ५४९ वर्षाची प्रदीर्घ परपंरा लाभलेल्या गोकर्ण पर्तगाळी मठाचे चोविसावे तरुण मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांचे शनिवारी करवीर नगरीत ताराराणी चौकातील अक्षता मंगल कार्यालयात भावपूर्ण वातावरणात जल्लोषी स्वागत करण्यात आले.
मठाधीशांचे सायंकाळी शाहूनाका, शिवाजी विद्यापीठ, ताराराणी चौक मार्गे युवा आघाडीने काढलेल्या भव्य दुचाकीच्या सहभागाने त्यांची मिरवणुक काढण्यात आली. त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीचा सहवास येत्या ९ एप्रिलपर्यंत लाभणार आहे.
तप्तमुद्राधारण सोहळ्यानंतर रविवारी सायंकाळी सात्विक रसाळ वाणीतून ते प्रवचन आणि भजनासह विविध उपक्रमातून सर्वांशी संवाद साधणार आहेत. सोमवारी ते अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन भजन सेवा, प्रवचनातून सर्वांची संवाद साधणार आहेत. मंगळवारी सकाळी भजन, प्रवचनानंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे. ते दुपारी ३ वाजता ते पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
स्वागत सोहळ्यात जीएसबी कोकणी व्यासपीठचे उमेश मरतप्पा प्रभू, संयोजन समितीचे अध्यक्ष करुणाकर नायक, उपाध्यक्ष सचिन शानबाग, सुरेंद्र प्रभु, सचिव गुरूराज शानबाग, युवा आघाडी प्रमुख शांतनु पै, कार्तिक शानबाग, महिला आघाडी प्रमुख सुमंगला पै यांच्यासह भक्तगणांनी मठाधीशांची पाद्यपूजा केली. यानंतर स्वामींनी थेट संवाद साधला. व्यापकपणे सामाजिक सकारात्मकता वाढवण्यासाठी प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.