गोकुळ दुध संघ निवडणूक - करवीर तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:22+5:302021-05-03T04:18:22+5:30
गोकुळ शेतकऱ्यांच्या हातात - गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान पार पडले. गोकुळ संघ हा दूध उत्पादकांच्या हातात जावा, यासाठी ...
गोकुळ शेतकऱ्यांच्या हातात -
गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान पार पडले. गोकुळ संघ हा दूध उत्पादकांच्या हातात जावा, यासाठी शाहू शेतकरी आघाडीतील २,२८० मतदारांनी मोठ्या उत्साहाने आमच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतली. म्हणून आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणाने या निवडणुकीत आमचे संपूर्ण पॅनल निवडून येईल आणि हा दूध संघ एका व्यापाऱ्याच्या हातातून शेतकऱ्यांच्या हातात जाईल.
सतेज पाटील, गृह राज्यमंत्री
विरोधी आघाडी
२. (प्रतिक्रिया - पी. एन. पाटील)
गेल्या तीस वर्षांत कोणी व्यापारी दूध संघात आला नाही. शेतकऱ्यांच्याच ताब्यात संघ आहे, तो उद्याही राहील. आमच्याकडेही २,२००च्या पुढे मतदार आहेत. आम्ही सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना काय पाहिजे, काय नको बघत आलोय. त्यामुळे विजयासाठी कोणतीही अडचणी राहिलेली नाही. आमचे संपूर्ण पॅनल निवडून येणार आहे. मागच्या वेळी दोन-तीन संचालक गेले, तरीही आपचे पॅनल आले. यावेळीही कोणी गेले म्हणून परिणाम होणार नाही.
पी. एन. पाटील, आमदार
सत्ताधारी आघाडी
- दोन्ही आघाडीतर्फे विजयाचा दावा -
कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात ‘गोकुळ’ फुलविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध संघावर कोणाची सत्ता येणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून आडाखे बांधले जात आहेत. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी सर्व पातळ्यांवर जोरदार तयारी केल्याने ही निवडणूक काटाजोड ठरली. त्यामुळे नेमके कोणते पॅनेल निवडून येणार, क्रॉस व्होटिंग झाले तर काय होणार, याचे आडाखे बांधणेदेखील अवघड झाले होते. परंतु, मतदार जेव्हा आज मतदान केंद्रावर पोहोचले, तेव्हा निकालाची पुसटशी कल्पना आली. मात्र, तरीही दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी आमचेच पॅनल येणार, असा ठाम दावा केला.
- पी. एन. पाटील केंद्राबाहेरुन परतले -
सत्तारुढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील हे दुपारी सव्वाबारा वाजता करवीर तालुक्यातील मतदार घेऊन कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयावर पोहोचले. केंद्रावर त्यावेळी त्यांच्या पॅनलचे उमेदवार बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, प्रताप पाटील, कावणेकर उपस्थित होते. पी. एन. पाटील यांनी आपल्या गटाच्या सर्व मतदारांना रांगेने मतदान केंद्रात सोडले आणि ते मात्र केंद्राबाहेरुनच माघारी परतले.
-विरोधकांनी केले, सत्ताधाऱ्यांचे स्वागत -
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीचे सर्व मतदार विवेकानंद महाविद्यालयावर पोहोचले, तेव्हा केंद्रावर सत्तारुढ गटाच्या चार उमेदवारांसह माजी आमदार संजयबाबा घाटगे स्वागताला उभे होते. त्याशिवाय अन्य कोणीही नेते तेथे नव्हते. परंतु, सत्ताधारी गटाचे मतदार जेव्हा केंद्रावर पोहोचले, त्यावेळी पालकमंत्री पाटील, आमदार ऋुतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, नाविद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक अशा सर्वांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले.
- पिवळ्या - पांढऱ्या टोप्यांनी वेधले लक्ष -
विवेकानंद महाविद्यालयाच्या केंद्रावर पोहोचलेल्या विरोधी गटाच्या मतदारांनी डोक्यावर पिवळ्या टोप्या व नाकाला पिवळे मास्क लावले होते. गळ्यात पिवळे स्कार्फ होते. त्यांचे आगमन आरटीओ कार्यालयाकडून झाले तर सत्तारुढ गटाच्या मतदारांनी डोक्यावर पांढऱ्या टोप्या व नाकाला पांढरे मास्क लावले होते. त्यांचे आगमन जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाजूने झाले. दोन्ही गटांनी मतदारांना आणण्यासाठी लक्झरी बसचा वापर केला होता.
केंद्राबाहेर समथकांची गर्दी -
विवेकानंद महाविद्यालयातील बार मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे येण्याचे मार्ग निश्चित करुन देण्यात आले होते. सत्तारुढ गटाच्या मतदारांना जिल्हा परिषदेकडून तर विरोधी आघाडीच्या मतदारांना आरटीओ कार्यालयाकडून सोडण्यात आले. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी केंद्राबाहेर गर्दी केली होती.
- तापलेले वातावरण अन् घोषणाबाजी -
कमालीच्या उष्म्याने वातावरण तापलेले असताना, दोन्ही बाजूकडील समर्थकांनी जोरदार घोषणबाजी करत वातावरण दणाणून सोडले. मतदार केंद्रात पोहोचत असतानाच ही घोषणाबाजी झाली.
-माजी महापौर शोभा बोंद्रेचा सवतासुबा -
काॅंग्रेसच्या माजी महापौर शोभा बोंद्रे व माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे सकाळी लवकर येऊन स्वतंत्रपणे मतदान करुन गेले. इंद्रजित हे विरोधी आघाडीतून उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मतदानाला हे दोघे स्वतंत्रपणे आल्यामुळे त्यांच्यातील नाराजी दिसून आली.