कोल्हापूर : गेल्या आठ वर्षांची गोंधळ व हुर्रेबाजीची परंपरा कायम ठेवत शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. तासभरात मंजूर-नामंजूरच्या घोषणांत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करण्यात आले. यावेळी गोंधळ घालण्याच्या हेतूनेच विरोधक आले होते, त्यांना ‘गोकुळ’चा अमूल संघ करायचा आहे, असा आरोप अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केला. तर सभा गुंडाळल्याचा आराेप करत विरोधी आघाडीच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी समांतर सभा घेतली.ही सभा संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील पशुखाद्य कारखाना आवारात घेण्यात आली. सकाळी दहा वाजल्यापासूनच सत्तारूढ गटाचे संस्था प्रतिनिधी सभामंडपात हजर होते. विरोधी आघाडीचे समर्थक येण्यापूर्वी सभामंडप पूर्णपणे भरला होता. शौमिका महाडिक या समर्थकांसह घोषणाबाजी करत सभास्थळी आल्यानंतर सत्तारूढ गटाच्या समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळ उडाला.
यामध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक सुरू केले. वीस मिनिटे त्यांनी संघाच्या कामकाजाचा आढावा घेत विविध योजनांची घोषणा केली. त्यानंतर कार्यकारी संचालक योगेश गोडेबोले यांनी विषयपत्रिकेचे वाचन सुरू करत प्रत्येक विषय वाचत मंजूर का? अशी विचारणा केली. यावर सत्तारूढ गटाकडून मंजूर तर विरोधी गटाकडून नामंजूरच्या घोषणा देण्यात आल्या.
७५ सीसीटीव्ही कॅमेरे व मोठा पाेलिस बंदोबस्तसभास्थळी ७५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्याचबरोबर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परराज्यातील म्हैस खरेदी अनुदानात ५ हजारांची वाढ‘गोकुळ’शी संलग्न दूध उत्पादकांना परराज्यातील म्हैस खरेदी अनुदानात ५ हजार रुपयांची वाढ केल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली. म्हैस दूधवाढीसाठी प्रोत्साहन म्हणून संस्थांच्या म्हैस दूध व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर ८० पैशांची वाढ करणार असून, आता २.२० रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर दिवाळी उत्पादक शेतकऱ्यांना दूध फरकापोटी १०४ कोटींची रक्कम देणार असल्याचेही अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.
‘गोकुळ’ची उलाढाल ३,४२८ कोटी : अरुण डोंगळे
- उलाढाल : ३,४२८ कोटी (गतवर्षी पेक्षा ४९९ कोटी).
- म्हैस दुधाचा खरेदी दर ५५.०६ रुपये, तर गाय दुधाचा खरेदी दर ३७.३६ रुपये
- परराज्यातून १,६४० म्हैस खरेदी
- संघाकडे येणाऱ्या दुधाला १ रुपये ८२ पैसे परतावा देणार ‘गोकुळ’ एकमेव संघ
- म्हैस दुधाला ५.४२ टक्के व गाय दुधाला ५.१६ टक्के दर फरक
- दूध फरक, डिबेंचर व्याज, लाभांशापोटी १०४ कोटी
- बायोगॅस योजनेतून दूध उत्पादकांना १७ कोटी ६० लाखांचे अनुदान
- म्हैस दुधाला संस्थांना व्यवस्थापन खर्चात प्रतिलीटर ८० पैशांनी वाढ करणार
- गेल्या वर्षीपेक्षा प्रति दिन सरासरी १ लाख ४ हजार लीटरने विक्रीत वाढ
- अहवाल सालात सेवा सुविधा व अनुदानापोटी १९ कोटी ८३ लाख दिले