कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांचा खून होऊन दोन वर्षे ९ महिने झाले. तरी अद्याप त्यांच्या मारेक-यांना पकडण्यात यश आलेले नाही. हे सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचे प्रतिपादन स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर )केले.
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या जन्म दिवसानिमित्त प्रसंगी सागरमाळ येथील निवासस्थानाजवळ त्या बोलत होत्या. यावेळी गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पत्नी उमा पानसरे यांनी पुष्पहार अर्पण करुन पूजन केले. याप्रसंगी शहीद क्रॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जन्मदिवसानिमित्त यावेळी कृष्णात कोरे यांनी प्रतिज्ञा म्हटली. ‘शहीद क्रॉमेड गोविंद पानसरे अमर रहें, अमर रहें ’, ‘लाल सलाम,लाल सलाम’ अशी घोषणाबाजी करुन उपस्थितांनी गोविंद पानसरे यांना अभिवादन केले. यावेळी गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेजवळ डॉ. नरेंद्र दाभोलकर व कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक एम.एम.कलबुर्गी यांच्या प्रतिमेचे पुस्तक ठेवण्यात आले होते.
मेघा पानसरे म्हणाल्या, गोविंद पानसरे यांच्यासह नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांचीसुद्धा अशा प्रकारची हत्या झाली. हे निषेधार्ह आहे. विवेकाचा आवाज बंद करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विवेकाचा विचार जिवंत ठेवला पाहिजे. प्रा. उदय नारकर म्हणाले, सर्वांनी अशीच एकजूट ठेवावी. क्रॉमेड गोविंद पानसरे यांची प्रेरणा निश्चित आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. यावेळी दिलीप पवार, आशा कुकडे, नामदेव गावडे, प्रा.रणधीर शिंदे , मुन्ना सय्यद , रघु कांबळे, विक्रम कदम, एस.बी.पाटील, जीवन बोडके, व्यंकाप्पा भोसले, आनंदराव परुळेकर, संभाजी जगदाळे,सतीश पाटील,सतीश पाटील, एम.बी.पडवळे, वसंत पाटील, हसन देसाई, उमेश पानसरे, मुकुंद कदम, बाळासाहे प्रभावळे आदी उपस्थित होते.