कोल्हापूर : सरकार टुरिझमला निधी देते पण विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी यांच्याकडे निधी नाही. पर्यावरण रक्षणासाठी चांदोली परिसरातील लोकांना विस्थापित करण्यात आले. वनविभागाने त्यांचे पुनर्वसन तर केले नाहीच पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेमके कार्यक्रमही राबविले नाहीत, अशी टीका ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी बुधवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सतरा दिवसांपासून चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले हे आंदोलन अत्यंत मूलभूत आहे. आम्ही या आंदोलनासोबत आहोत अशा शब्दांत पाठिंबा दर्शवला.
ते म्हणाले, चांदोली हा जागतिक वारसा आहे, त्याचे रक्षण करणे ही जबाबदारी असताना विभागाकडून असे कोणतेच काम झालेले दिसत नाही. ज्या झाडावर पक्षी घरटेही बांधत नाहीत अशी परदेशी झाडे लावून पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनवून जैवविविधता उद्ध्वस्त केली. त्यांना आता खड्या आवाजात प्रश्न विचारला पाहिजे.
संघटनेचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी प्रास्ताविकात पर्यावरणतज्ज्ञ आणि बुद्धिजिवी वर्ग एकत्र आला तर आंदोलनाचे बळ वाढते, तसेच पर्यावरण आणि वनविभागाला निश्चितच दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी उदय गायकवाड, मारुती पाटील, डी. के. बोडके, प्रकाश बेलवलकर, पांडुरंग कोठारी, आनंदा आमकर यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.
---
फोटो नं १७०३२०२१-कोल-मधूकर बाचूळकर
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सुुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पाठिंबा दिला व मनोगत व्यक्त केले.