विक्रम पाटील-- करंजफेणएका वर्षामागे पावसाचे प्रमाण अचानकपणे तुरळक झाल्यामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. पाऊस कमी होण्याचे मुख्य कारण बेसुमार वृक्षतोड हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे मागील वर्षी राज्यभर मोठा गाजावाजा व जनजागृती करून १ जुलैला राज्यात एक कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. या दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याला आठ लाख आठ हजार ५७७ रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. वनविभाग, सामाजिक सेवाभावी संस्था, शाळा, ग्रामपंचायती व काही व्यक्तिगत पातळीवरील लोकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आठ लाख २२ हजार रोपांची लागवड केली. मागील वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे लावण केलेली रोपे चांगलीच तरारली. दरम्यानच्या काळात लागवडीपैकी ७० टक्के रोपे जगली होती; परंतु वृक्षसंगोपनाकडे सर्वच सरकारी, निमसरकारी कार्यालयांनी दुर्लक्ष केल्यामुळे पाण्याअभावी अनेक ठिकाणची रोपे सुकून गेली. ग्रामीण भागामध्ये शाळा व ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लावणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षकांनी काही प्रमाणात रोपे जिवंत ठेवल्याचे दिसत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला कमीत कमी शंभर वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे काही तुरळक ग्रामपंचायती वगळता बहुतांश पंचायतींनी शासनाच्या वृक्षलागवड योजनेचा बोऱ्या उडविला आहे. वृक्षलागवड उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सरकारी कार्यालयांना अहवाल देण्याचे बंधन घातले होते; परंतु अनेक कार्यालयांनी अहवालच पाठविला नसल्याचे समोर येत आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडे सर्व्हे करण्यात पुरेशी यंत्रणा नसल्याचे समजते. बहुतांश कार्यालयातून या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही मोहीम फोटोसेशनसाठी तर राबविण्यात आली नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. वृक्ष लागवडीसाठी योग्य नियोजनाची प्रामुख्याने गरज असते. आॅक्टोबर ते मे महिन्याच्या दरम्यान रोपांना पाणी घालणे, भांगलण करून कुंपण करण्याची खरी गरज असते. वेळच्यावेळी पाणी घातल्यास शासनाची योजना सफल तर होईलच, परंतु पर्यावरणामध्ये समतोल राहण्यास मोठा फायदा होईल.-सरदार रणदिवे, पर्यावरण, अभ्यासक. वृक्ष लागवड हा उपक्रम चांगल्या प्रकारचा असून, प्रत्येक वर्षी राबविण्याची गरज आहे. आमच्या कळे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीने शंभर वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी ८० रोपे पूर्णपणे जगली आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली मुख्य जबाबदारी म्हणून काम केल्यास शासनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास वेळ लागणार आहे.-बाजीराव गायकवाड, ग्रामसेवक, कळे, ता. पन्हाळा.
शासनाची ‘वृक्ष लागवड’ मातीमोल
By admin | Published: March 20, 2017 11:29 PM