कोल्हापूर : राज्यपाल सी. विद्यासागर राव शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यांवर आले. या दौऱ्यात राज्यपालांनी रंकाळा तलावाला दहा मिनिटांची भेट दिली. नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच पोहचलेल्या राज्यपालांचे स्वागत महापौर सरीता मोरे यांनी केले.राज्यपाल सी. विद्यासागर राव शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यांवर आले आहेत. त्यांचा दौरा गुरुवारी दुपारी निश्चित झाला. सायंकाळी तर ते रंकाळा तलावास भेट देणाार असल्याची माहिती महापालिका प्रशासनास प्राप्त झाली. वरिष्ठ अधिकारी यांनी रात्री तलावाजवळील नियोजित भेटीच्या ठिकाणची पाहणी केली.
शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी टॉवर आणि परिसरातील फरशा, रस्ते पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला. एक छोटेखानी शामियाना उभारुन तेथे रेड कारपेट सुध्दा अंथरले. ही सर्व तयारी पाहण्याकरीता अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत जातीनिशी उपस्थित होते.सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी राज्यपाल रंकाळा तलावाच्या टॉवर परिसरात येणार होते. परंतु प्रत्यक्षात ते १० वाजून ३५ मिनिटांनीच तेथे पोहचले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी त्यांचे स्वागत केले. दहा मिनिटे राज्यपाल रंकाळा तलावावर पाहणी करत होते. त्यांना जाधव यांच्यासह नेत्रदिप सरनोबत यांनी तलावावर होणार असलेल्या कामांची माहिती दिली.राज्यपालांनी टॉवर, संध्यामठ (लांबूनच)याची पाहणी केल्यानंतर विकास कामाचे आराखडे घेऊन मुंबईला या एवढेच बोलले आणि गाड्यांकडे वळले. त्यावेळी महापौर मोरे पोहचल्या. राज्यपाल गाडीत बसले, निघून गेले. राज्यपाल गेल्यानंतर दहा मिनिटांनी स्थायी सभापती शारंगधर देशमुख तेथे पोहचले.