कबनूर : कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी गावातील आपत्ती निवारण ग्राम समिती व ग्रामपंचायतीने लॉकडाऊनसह कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करायला हवी, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
कबनूर गावची लोकसंख्या मोठी आहे. गावास देण्यात येणारा लसीचा पुरवठा लोकसंख्येच्या मानाने अत्यल्प आहे. तसेच गावातील आभार फाटा येथे तयार असलेल्या बचत गट इमारतीमध्ये कबनूर गावासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यात यावे. त्या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शोभा पोवार यांनी दिले. यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, जि. प. सदस्या विजया पाटील, मुरलीधर जाधव, सुधाकरराव मणेरे, बी. डी. पाटील, संचालक प्रमोद पाटील, तलाठी एस. डी. पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार यांच्यासह साजणी आरोग्य केंद्राकडील आरोग्य अधिकारी, डॉक्टर, आशासेविका उपस्थित होते.