श्रवणबेळगोळला निघाली भव्य मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:24 AM2018-02-06T05:24:20+5:302018-02-06T05:24:25+5:30
जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असणा-या श्रवणबेळगोळ ( कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कोल्हापूर: जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असणा-या श्रवणबेळगोळ ( कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात देशभरातून आलेले श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत २०० तुतारी, १०८ ढोल, १०८ बँड, १०८ घंटा, १०८ शंख, १०८ ध्वज यासह विशेष वाद्यवृंदांचा समावेश होता.
बुधवार (दि. ७) पासून पंचकल्याणक विधींनी महामस्तकाभिषेकच्या महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रवणबेळगोळ येथे सोमवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीबरोबरच नादीमंगल पूजेचेही आयोजन केले होते. यावेळी श्रवणबेळगोळजवळच्या सर्व जैन मंदिरांतील तीर्थंकराच्या मूर्तींवर जल, गंध, केशर, पुष्प यांनी विशेष अभिषेक करण्यात आला. पूजेवेळी विविध मान्यवरांच्या हस्ते चतुर्विध दान म्हणजेच शास्त्र, अभय, वस्त्र व आहार दान करण्यात आले.
आचार्य वंदना हा कार्यक्रमही पार पडला. देशभरातून आलेल्या शेकडो मुनी, भगवंतांना महोत्सव समितीचे पदाधिकारी, श्रावक यांनी वंदन केले आणि आशीर्वाद घेतले. दुपारी आचार्य निमंत्रणानंतर आचार्य वर्धमानसागर, आचार्य देवनंदी, आचार्य पुष्पदंतसागर महाराज व अन्य त्यागी गण मिरवणुकीसह पंचकल्याण पूजा होत असलेल्या संस्कार हॉल या ठिकाणी गेले. या ठिकाणी त्यागींच्या उपस्थितीत काही धार्मिक विधी करण्यात आले. दरम्यान, देशभरातून आलेल्या भाविकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव येथील वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक नगरमध्ये तात्पुरते हॉस्पिटल सुरू केले आहे.
>अभिषेकासाठी
दहा प्रकारचे कलश
या महामस्तकाभिषेकासाठी नवरत्न, रत्न, स्वर्ण, दिव्य, रजत, ताम्र, कांस्य, शुभमंगल, मंगल, गुल्लकाजी अशा दहा प्रकारच्या कलशांनी महामूर्तीवर अभिषेक होणार आहे. यामध्ये या कलशप्रकारांचा समावेश आहे.
>१७ भोजनशाळा
श्रवणबेळगोळ येथे एकूण १७ भोजनशाळा उभारण्यात आल्या आहेत. मुख्य मंडपामध्ये एकावेळी चाळीस हजार लोक बसतील अशी भव्य बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.