इचलकरंजीतील कापड खरेदी-विक्रीला जीएसटीचा फटका
By admin | Published: July 6, 2017 01:03 AM2017-07-06T01:03:15+5:302017-07-06T01:03:30+5:30
बाजारपेठ ठप्प : बड्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम : यंत्रमागधारकांकडून आठवड्यातील तीन दिवस कारखाने बंदचा निर्णय
राजाराम पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : घाऊक कापड खरेदी करणाऱ्या पाली-बालोत्रा, अहमदाबाद, दिल्ली अशा पेठांतील व्यापाऱ्यांनी जीएसटीच्या विरोधात खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे इचलकरंजीतील यंत्रमाग कापडाचा होणारा उठाव पूर्णपणे ठप्प झाला आहे. यंत्रमागधारकांनी कापड उत्पादनात घट करण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सायझिंग कारखानेसुद्धा अंशत: बंद आहेत. इचलकरंजी व परिसरामध्ये एक लाख यंत्रमाग आणि ३५ हजार सेमी आॅटो व आॅटोलूम्स आहेत. यंत्रमाग व आॅटोलूमच्या कारखान्यांतून दररोज सुमारे ५० कोटी रुपयांच्या कापडाची निर्मिती होते. यापैकी ८० टक्के मागांवर सुती कापड तयार होते. सुती कापडासाठी पाच टक्के जीएसटी व सिंथेटिक कापडासाठी १८ टक्के जीएसटी १ जुलैपासून लागू झाला आहे. वस्त्रोद्योगाला जीएसटीतून वगळावे, या मागणीसाठी गुजरात, राजस्थान व दिल्ली येथील घाऊक कापड व्यापाऱ्यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून बंद पुकारला आहे. त्याचा परिणाम म्हणून इचलकरंजीतून गुजरात, राजस्थान व दिल्ली येथील व्यापाऱ्यांकडून होणारी ८५ टक्के कापडाची खरेदी बंद झाली आहे. त्याचा परिणाम
१ जुलैपासून इचलकरंजीमध्ये दिसू लागला आहे.
आगाऊ सौदे करण्यात आलेल्या कापडाची तपासणी गेल्या आठवड्यापासून बंद झाली आहे. कापडाचा उठाव होत नसल्याने आता यंत्रमागधारकांनी आपापली कारखाने आठवड्यातून तीन दिवस बंदठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सुतापासून बिमे तयार करण्यासाठी सायझिंग कारखान्यावर सूत येणे बंद झाले असल्याने सायझिंग कारखान्यांचेसुद्धा उत्पादन घटले आहे. ‘जीएसटी’बाबत गोंधळ’
कापड विक्रीसाठी इचलकरंजीतील यंत्रमाग कारखानदारांकडून जीएसटीचा नंबर काढण्यास सुरुवात झाली आहे. जीएसटी नंबर घेण्यासाठी शहरातील चार्टर्ड अकौंटंटच्या कार्यालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र, ज्यांना यंत्रमागावर निर्मित कापड विकायचे, अशा व्यापाऱ्यांकडून अद्याप जीएसटीचा नंबर येण्यास सुरुवात झाली नसल्याने येथील वस्त्रोद्योगात मोठ्या गोंधळाचे वातावरण आहे.
१ शहर व परिसरात असणाऱ्या सेमी आॅटो व आॅटोलूम्सच्या कारखान्यांतून निर्माण होणाऱ्या सुती व सिंथेटिक कापडालासुद्धा गिऱ्हाईक नसल्यामुळे कापडाच्या मागणीत घट झाली आहे.
२ याचा परिणाम म्हणून आॅटोलूमच्या जॉबरेटमध्ये घट झाली असून, मागील महिन्यात १६ ते १९ पैसे प्रतिमीटर मिळणारा जॉबरेट आता १० ते १२ पैसे इतका उतरला .
३ मात्र, पुढे कापडाच्या मागणीचा कार्यक्रम नसल्याने आॅटोलूम कारखानेसुद्धा पुढील आठवड्यापासून बंद पडू लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
अडत व्यापाऱ्यांचा अघोषित बंद
इचलकरंजीतील यंत्रमागधारकांकडून ग्रे कापड खरेदी करून राजस्थान, अहमदाबाद व दिल्ली येथील व्यापाऱ्यांना पाठविणाऱ्या अडत व्यापाऱ्यांनी अधिकृतपणे खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, बड्या व्यापाऱ्यांकडून कापडास मागणी नसल्यामुळे अडत व्यापाऱ्यांनीसुद्धा नवीन सौदे करणे थांबविले आहे. त्याचबरोबर जुन्या सौद्यांची कापडाची खरेदीसुद्धा बंद केली असल्यामुळे इचलकरंजीतील कापडाच्या बाजारात अघोषित बंदचे वातावरण आहे.