Gudhi padwa 2018 कोल्हापूर : गुढीपाडव्याची लगबग सुरू, साखरेच्या गाठींनी बाजारपेठेला गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:57 PM2018-03-14T19:57:05+5:302018-03-14T19:57:05+5:30
हिंदू नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठींनी (माळा) कोल्हापुरातील बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या सणासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे.
कोल्हापूर : हिंदू नववर्षारंभ असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त दाखल झालेल्या साखरेच्या गाठींनी (माळा) कोल्हापुरातील बाजारपेठेलाही गोडवा आला आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या सणासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे.
हिंदू पंचांगांनुसार चैत्र महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यानुसारच वर्षातील सगळे सण साजरे होतात, म्हणून या महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला आणि पूर्ण मुहूर्त म्हणूनही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
वसंतऋतूचे आगमन आणि सृजनाचा आनंदोत्सव असलेल्या यादिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीला व देवतांना साखरेच्या माळा घालून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. आरोग्यदायी जीवनाचा संदेश देत संस्कृतीतून कडुलिंबाचे महत्त्व सांगितले जाते.
यानिमित्त कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, मिरजकर तिकटी, टिंबर मार्केट या बाजारपेठेत साखरेच्या माळांची मोठी आवक झाली आहे. विविध रंगांतील या माळा दहा रुपयांपासून उपलब्ध आहेत. गुढी उभारण्यासाठी लागणारी चिव्याची काठी ८० रुपयांपासून उपलब्ध आहे.
यादिवशी कौटुंबीक समारंभ, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय-उद्योगाचा शुभारंभ अशी मंगलकार्ये केली जातात. त्यामुळे कपड्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. मुहूर्ताची खरेदी करत प्रत्येक घरात एका तरी नवीन वस्तूचे आगमन होते.
सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीकडे नागरिकांचा ओढा असल्याने विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बुकिंगसाठीही मोठी गर्दी होत आहे. दुसरीकडे कंपन्यांनीही ग्राहकांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.