संतोष मिठारीकोल्हापूर : एच-१ बी व्हिसा निलंबित झाल्याने नोकरी अथवा शिक्षणासाठी अमेरिकेत असलेल्या, त्या ठिकाणी जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे २५० जणांसमोर अडचण निर्माण झाली आहे. हा व्हिसा घेऊन त्या ठिकाणी ऑनसाईट काम करणाऱ्या आयटी कंपन्यांनाही फटका बसणार आहे.एच-१ बी आणि विदेशी कामगारांना दिले जाणारे इतर सर्व कामकाजी व्हिसा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निलंबित केले आहेत. त्याचा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि आयटी कंपन्यांवर काय परिणाम होणार याचा आढावालोकमतने घेतला.
अमेरिकेत विविध क्षेत्रांतील उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याकरिता आणि त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी विद्यार्थी, नोकरदार हे एच-१ बी व्हिसा घेतात. त्यांतील काहीजण शिक्षण घेण्याआधी, तर काहीजण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा व्हिसा मिळवितात. विविध आयटी कंपन्या अमेरिकेत ऑनसाईट काम करणाऱ्यासाठी हा व्हिसा घेऊन भारतातील मनुष्यबळ त्या ठिकाणी पाठवितात. कारण, अमेरिकेतील स्थानिक मनुष्यबळापेक्षा भारतातून कमी वेतनात मनुष्यबळ मिळते आणि हे त्या कंपन्यांना फायदेशीर ठरत होते.
त्यामुळे बहुतांश कंपन्या या व्हिसाचा उपयोग करून घेत होत्या. मात्र, आता हा व्हिसा निलंबित झाल्याने कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील अशा साधारणत: चार कंपन्यांची अडचण वाढणार आहे; तर शिक्षण, नोकरीनिमित्त अमेरिकेत असलेल्या २५० जणांना मायदेशी परतावे लागणार आहे. उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी अमेरिकेला जाण्याच्या तयारीत अथवा प्रतीक्षेत असलेल्यांना मात्र, त्यासाठी आता मुकावे लागणार आहे.
एच-१ बी व्हिसा घेऊन शिक्षण, नोकरीसाठी अमेरिकेत दरवर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून सुमारे २५० जण जातात. व्हिसा निलंबनामुळे त्यांची अडचण झाली आहे. १० वर्षांहून अधिक काळ त्या ठिकाणी भारतातील अनेकजण काम करीत आहेत. त्यांचा व्हिसा कायम ठेवण्याचा निर्णय होण्याबाबत केंद्र सरकारने पाठपुरावा करावा.-बी. व्ही. वराडे, पर्यटनतज्ज्ञ
या व्हिसा निलंबनाच्या निर्णयाचा लोकल मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या आयटी कंपन्यांवर परिणाम होणार नाही; पण अमेरिकेत ऑनसाईट कामासाठी आपल्या देशातून कर्मचारी पाठविणाऱ्या कंपन्यांची अडचण होणार आहे.- विनय गुप्ते, आयटी उद्योजक
व्यवसायासाठी व्हिसा घेण्याचा पर्यायनोकरीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेमध्ये असलेल्यांना भारतात परत येणे शक्य होणार नाही. त्यामुळे आता तेथे व्यवसाय करण्याचा व्हिसा घेऊन राहण्याच्या पर्याय त्यांना निवडता येणार आहे.एच-१ बी व्हिसा म्हणजे काय?एच-१ बी व्हिसा हा अमेरिकेमध्ये दाखल होण्यासाठीचा एक प्रकारचा व्हिसा आहे. हा व्हिसा इमिग्रेशन ॲण्ड नॅशनालिटी ॲक्टच्या कलम १०१ (ए)(१५)-(एच)नुसार दिला जातो. अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक व्हिसांपैकी हा एक आहे. हा व्हिसा परदेशी लोकांनी अमेरिकेत ठरावीक मुदतीसाठी ये-जा करण्यासाठी तसेच पगारी काम करण्यासाठी देण्यात येतो. हा व्हिसा घेऊन अमेरिकेत दाखल झाल्यावर ठरावीक कंपनीकरता ठरावीक मुदतीसाठी ठरावीक काम करण्याची मुभा मिळते. (संदर्भ : विकिपीडिया)