म्हाकवेतील ‘हनुमान’ची दुरंगी लढत
By Admin | Published: February 27, 2015 10:17 PM2015-02-27T22:17:08+5:302015-02-27T23:19:31+5:30
प्रचारास वेग : मंडलिक-मुश्रीफ गट आमने-सामने
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील हनुमान सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरल्याने २ मार्चला यासाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक थेट माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ गटातच होत आहे. गत निवडणुकीत मुश्रीफ गटाने ही संस्था मंडलिक गटाकडून हस्तगत केली होती. दोन्हीही गटांकडून एक एक मत मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.१९ जागांसाठी ही दुरंगी लढत होत आहे. ६०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मुश्रीफ गटामार्फत विद्यमान चेअरमन सिद्राम पाटील, विश्वनाथ भरवसे, हिंदुराव पाटील तसेच इतर मागास गटातून दशरथ माळी, मागासवर्गीय गटातून आकाराम कांबळे रिंगणात आहेत.तर दिनेश पाटील सदासाखरचे संचालक बंडोपंत चौगुले, माजी सरपंच एकनाथ पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलिक गटाकडून निवृत्ती चौगुले, बाजीराव देवडकर, शामराव देवडकर, आर. एस. पाटील, सुनील देवडकर, शिवाजी वाडकर, संभाजी पाटील, नामदेव देवडकर, इतर मागास गटातून बाजीराव कुंभार मागासवर्गीय गटातून अनिल कांबळे हे लढत आहेत.
अन् बिनविरोधला ‘खो’
१९९१-९२ मध्ये स्थापन झाल्यापासून ही संस्था मंडलिक गटाकडेच होती. मंडलिक गटाच्या विभाजनानंतर संस्थेवर मुश्रीफ गटाने एक हाती सत्ता मिळवली. तरीही यावर्षीची निवडणूक विना संघर्ष आणि शांततेत व्हावी, अशी दोन्हीकडील नेतृत्व करणाऱ्यांना वाटत होते. त्यादृष्टीने बिनविरोधचा समझोताही होता. मात्र, दोन्ही गटांतर्गत सदस्य निवडीबाबत एकमत न झाल्याने निवडणुकीला सामारे जावे लागले आहे.
जावा-जावा रिंगणात
महिला गटातून साऊबाई वसंत पाटील या मंडलिक गटानुसार छाया सिद्धेश्वर पाटील या मुश्रीफ गटातून निवडणूक लढवित आहेत. चुलत जावांमध्ये होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.