हापूस आंब्याची पेटी तीन हजारांत
By admin | Published: February 9, 2015 12:14 AM2015-02-09T00:14:39+5:302015-02-09T00:38:33+5:30
भाज्यांच्या दरात घसरण : गवारी प्रतिकिलो ८० रुपये; कच्ची कैरी अन् द्राक्षांची आवक वाढली
कोल्हापूर : शहरातील बाजारात रविवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण झाली आहे; तर इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे, आंबा व हापूस आंब्याची आवक कोल्हापूर बाजार समितीत आली आहे, पण प्रत्यक्षात बाजारात हापूस आंबा दाखल झालेला नाही. आंब्याच्या एका पेटीचा दर तीन हजार रुपये आहे. लोणचे, गुळांबा व करम यांसाठी लागणारी कच्ची कैरी बाजारात दाखल झाली. कच्च्या कैरीचा दर (एक नग) २० रुपये होता. एकंदरीत, भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असल्याचे चित्र होते.
शहरातील सर्व बाजारपेठांत रविवारी द्राक्षे (थॉमसन, सोनाका प्रकार) व काळी द्राक्षे, वाटाणा शेंगा यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोनामाचा दर ८० ते शंभर रुपये, थॉमसनचा दर ५० ते ६० रुपये असा प्रतिकिलो होता. वाटाण्याच्या शेंगांचा दर प्रतिकिलो ४० रुपये असा होता. कोथिंबीर, मेथी, पोकळा यांचे दर स्थिर आहेत. प्रतिकिलो गवारी आता ८० रुपये झाली आहे. गतआठवड्यापेक्षा गवारीचा दर दहा रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, ओला वाटाणा ३५ रुपये झाला आहे. त्यात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मोसंबी, माल्टाचे दर घसरले. या आठवड्यात मोसंबी ६५० रुपये (चुमडे), २५० रुपये (चुमडे) आहे, तर चिक्कू, पेरू, सफरचंद, अननस, कलिंगडे, बोरे, पपई, केळी (वसई), कवठ, स्ट्रॉबेरी यांची आवक वाढली आहे; पण दर स्थिर आहेत.
गुळाच्या दरात वाढ
बाजारात गुळाची (रवे)आवक कमी झाल्याने दरामध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाचा सरासरी दर आता ३२२५ रुपये झाला आहे. याचे कारण गुऱ्हाळ कमी झाल्याचे गूळ व्यावसायिकांनी सांगितले. सध्या किरकोळ बाजारात गूळ प्रतिकिलो ३५ रुपयांपासून ते ३७ रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, गत चार महिन्यांतील गुळाच्या दरात झालेली ही पहिली वाढ आहे. यापूर्वी गुळाचा दर स्थिर होता.
डाळींच्या दरात तब्बल आठ रुपयांनी वाढ
गत आठवड्यात बाजारात हरभराडाळ ४० रुपये प्रतिकिलो होती. ती आता ४८ रुपये, तूरडाळ ८२ रुपयांवरून ९० रुपये झाली. साखर २८ ते ३० रुपये, मूगडाळ १२० रुपये, मूग व मटकी शंभर रुपये, तीळ १६० रुपये, तर सरकी ७२ रुपये आहे. या सर्वांचे दर स्थिर आहेत.
तासगाव, मिरज, सांगली, कागल या भागांमधून द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत द्राक्षांचे दर कमी झाले आहेत.
- शरद जगदने, फळविक्रेते, कोल्हापूर.
कांदा, लसूण तेजीत
घाऊक बाजारात कांद्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दहा किलोंचा सरासरी दर १३० रुपये, तर लसणाचा दर ४०० रुपये झाला आहे. कांदा व लसूण यांशिवाय जेवणाला पूर्णत्वच येत नाही; त्यामुळे जेवणामध्ये त्याचा सर्रास वापर असतो. त्यामुळे यांची मागणी स्थिरच असते.