‘हरळी’ची लेक : ‘दुर्मीळ’ आजाराने त्रस्त, पोटासाठी मोलमजुरी करीत कुटुंब राहतेय गोव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:46 AM2018-07-21T00:46:31+5:302018-07-21T00:46:44+5:30
‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा जगात अतिशय दुर्मीळ मानला जाणारा आजार जडलेल्या गडहिंग्लजच्या लेकीला दानशुरांच्या मदतीची गरज आहे. मूळचे गडहिंग्लज तालुक्यात हरळी येथील तिचे आई-वडील पोटासाठी गोव्यात मोलमजुरी
राम मगदूम।
गडहिंग्लज : ‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा जगात अतिशय दुर्मीळ मानला जाणारा आजार जडलेल्या गडहिंग्लजच्या लेकीला दानशुरांच्या मदतीची गरज आहे. मूळचे गडहिंग्लज तालुक्यात हरळी येथील तिचे आई-वडील पोटासाठी गोव्यात मोलमजुरी करीत आहेत. गरिबीमुळे मुलीच्या उपचाराचा लक्षावधीचा खर्च पेलणे त्यांना
केवळ अशक्य आहे. म्हणूनच गोव्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असलेल्या ९ वर्षीय संस्कृतीला दानशुरांच्या मदतीचीही गरज आहे.
हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील सुधाकर सत्याप्पा कांबळे यांचे कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी गोव्यातील पेडणे नजीकच्या तुये गावात वास्तव्यास आहेत. त्यांच्यावर वयोवृद्ध आई-वडिलांसह पत्नी व तीन मुलांच्या संगोपनाचा भार आहे. ‘संस्कृती’ ही त्यांची द्वितीय कन्या असून,ती तुये येथील डॉन बास्को हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकत आहे.
दरम्यान, मार्च २०१८ मध्ये वार्षिक परीक्षेला जाताना चक्कर आलीआणि उलट्या सुरू झाल्या. अनेक दवाखान्यात दाखवूनही तिलाबरे न वाटल्यामुळे तिला जिल्हा रूग्णालयात आणि तेथून गोवा मेडीकल कॉलेजच्या रूग्णालयात पाठविण्यात आले.
त्याठिकाणी अनेक चाचण्या होऊनही तिच्या आजाराने निदान झाले नाही. त्यामुळे तिच्या किडनीचा छोटासा भाग मणीपाल येथील दवाखान्यात पाठविण्यात आला. तेथील तपासणी अहवालात तिला हा दुर्धर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्यावर जुने गोवे येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
देशातील २५ वी रूग्ण
‘गुड पाश्चर सिंड्रोम’ हा आजार लाखामध्ये एकाला होतो. हा आजार जडलेली संस्कृती ही गोव्यातील पहिली तर देशातील २५ वी रूग्ण आहे. तिच्यावर सध्या जुने गोवे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आजपर्यंच्या उपचाराचे बिल सुमारे ४ लाख इतके झाले असून स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या आणि सोशल मीडियावरील आवाहनामुळे काही दानशुरांनी दिलेल्या मदतीतून तो खर्च भागविण्यात आला आहे.
किडनी बदलावी लागणार
तीन महिन्यांच्या उपचारात तिच्या किडनींनी साथ न दिल्यास तिच्या किडन्या बदलाव्या लागणार आहेत. त्यासाठी किमान ३० लाखांचा खर्च येईल, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. संस्कृतीच्या उपचारासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून दवाखान्याचे हेलपाटे सुरू झाल्यामुळे तिच्या वडिलांना कामावर जाता आलेले नाही. सध्या दिवसाआड तिच्यावर ‘डायलेसीस’ सुरू असून, वारंवार कराव्या लागणाऱ्या महागड्या तपासण्यांमुळे तिचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत.
आरोग्य मंत्र्यांना वडिलांचे साकडे
पंडित दीनदयाळ उपाध्याय आरोग्य विमा योजनेतून ‘संस्कृती’च्या उपचारार्थ केवळ ४० हजार २५० रूपये इतकीच रक्कम मंजूर झाली आहे. आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी विनंती तिचे वडील सुधाकर यांनी गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.