कोल्हापूर : कोरोनामुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या तयारीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यातील १७१ पैकी १४० शाळांनी प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्यास तयार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाला संमतिपत्र दिली आहेत. या तालुक्यापाठोपाठ १०७ शाळांसह कोल्हापूर शहर, तर १०५ शाळांसह करवीर तालुका आहे.
शासनाने राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये पहिल्या टप्प्यात दि. १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील १०५४ शाळांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करत प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्याची तयारी ९४३ शाळांनी दर्शविली असून, त्याबाबत शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यामध्ये अनुदानित शाळांची संख्या ६७७ इतकी आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शविलेल्या शाळांनी पालकांकडून संमतिपत्र घेतली आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने तयार केलेल्या लिंकमध्ये या शाळांनी नववी आणि दहावीचे वर्ग भरवण्यास सर्वांची संमती असल्याचे नोंदविले आहे. राज्य शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्याची कार्यवाही शाळांनी करावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बुधवारी केले.
चौकट
पालकांचे संमतिपत्र, ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक
शासनाने दि. १५ जुलैपासून कोरोनामुक्त ग्रामीण क्षेत्रातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. विविध मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याबाबतचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी काढला आहे. पालकांसमवेत चर्चा करून ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव करावा. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी. त्यात तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचा समावेश असावा. ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम शाळा व्यवस्थापन समितीने राबवावी. कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था करावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी, आदी सूचनांचा या आदेशात समावेश आहे.
पॉंईंटर
प्रत्यक्ष अध्यापन सुरू करू शकणाऱ्या शाळांची तालुकानिहाय संख्या
हातकणंगले : १४०
कोल्हापूर शहर : १०७
करवीर : १०५
पन्हाळा : ९१
कागल : ८५
शिरोळ : ८१
गडहिंग्लज : ७०
चंदगड : ६६
राधानगरी : ५९
भुदरगड : ५१
शाहूवाडी : ४९
आजरा : २९
गगनबावडा : १०