प्रमुखांना ‘बंडखोरी’चे आव्हान
By admin | Published: October 2, 2014 12:36 AM2014-10-02T00:36:40+5:302014-10-02T00:38:03+5:30
बहुरंगी लढती : राष्ट्रवादीत दुहेरी आव्हान, काँगे्रस-स्वाभिमानीतही बंडखोरी
राम मगदूम -- गडहिंग्लज--नव्या चंदगड मतदारसंघाची ही दुसरी निवडणूक सर्वार्थाने गाजणार आहे. विक्रमी उमेदवारांमुळे ही निवडणूक बहुरंगी होत आहे. तब्बल १८ उमेदवार रिंगणात असून, शिवसेना व जनसुराज्य वगळता सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरीचे आव्हान आहे. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे मिळून ११, तर सात अपक्ष उमेदवार भविष्य अजमावत असले तरी बहुरंगी सामना प्रामुख्याने आठ उमेदवारांतच होत आहे.
दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनाच राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे. संध्यादेवींचे पुतणे व ‘राष्ट्रवादी युवक’चे जिल्हाध्यक्ष संग्रामसिंह कुपेकर यांना ‘जनसुराज्य’ने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य व गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक अप्पी पाटील यांनीही त्यांना आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीतूनच मिळालेल्या दुहेरी आव्हानामुळे संध्यादेवी अडचणीत सापडल्या आहेत.
पोटनिवडणुकीतील संध्यादेवींचे प्रबळ प्रतिस्पर्धी ‘स्वाभिमानी’चे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना त्यांच्याच पक्षाचे चंदगड तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांनी आव्हान दिले आहे. मात्र, पोटनिवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या शिवसेनेच्या प्रा. सुनील शिंत्रे यांनी माजी आमदार व शिवसेनेचे उमेदवार नरसिंगराव पाटील यांच्यासाठी माघार घेतली आहे.
नेहमी अपक्ष लढणारे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यावेळी काँगे्रसतर्फे रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी काँगे्रस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या अंजना रेडेकर, युवक काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर गुरबे, स्व. राजकुमार हत्तरकी यांचे चिरंजीव सदानंद
हत्तरकी यांनी माघार घेतली असली तरी त्यांनाही पक्षातूनच आव्हान मिळाले आहे. काँगे्रसचे कार्यकर्ते व ओमसाई आघाडीचे प्रमुख संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी अपक्ष उमेदवारी ठेवून त्यांना आव्हान दिले आहे.
माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांची कन्या प्रा. स्वाती कोरी या जनता दलातर्फे रिंगणात आहेत. याशिवाय मनसे, शेकाप, बसपा, भारिप बहुजन महासंघ, भारतीय नवजवान सेना या पक्षांचे उमेदवारही रिंगणात उतरले आहेत.
गोपाळराव, प्रकाशरावांची भूमिका निर्णायक!
स्व. कुपेकर यांचे २००९ च्या निवडणुकीतील निकटचे प्रतिस्पर्धी व दौलत कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे, तर २००४ च्या निवडणुकीतील कुपेकरांचे प्रतिस्पर्धी व गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण हे उमेदवारी दाखल करतानाच अप्पी पाटील यांच्यासोबत होते. या दोघांचीही भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे.
(अपक्ष उमेदवार : अप्पी पाटील, संभाजीराव देसाई-शिरोलीकर, काशीनाथ कांबळे, नामदेव सुतार, मोहन कांबळे, मोहन पाटील).
नावचंदगड
एकूण मतदार २,९७,७४२ पक्ष
संध्यादेवी कुपेकर राष्ट्रवादी
भरमूअण्णा पाटीलकाँग्रेस
नरसिंगराव पाटील शिवसेना
राजेंद्र गड्ड्यान्नावर स्वाभिमानी
संग्रामसिंह कुपेकर जनसुराज्य शक्ती
प्रा. स्वाती कोरी जनता दल
रवींद्रकुमार पाटीलशेकाप
दिवाकर पाटीलमनसे
पृथ्वीराज देसाई भारतीय नवजवान सेना
काडाप्पा कांबळे बसपा
दत्तात्रय अत्याळकर भारिप ब.महासंघ
नितीन देसाई अपक्ष