कोल्हापूर : ‘एमबीबीएस’झालेले डॉक्टर आरोग्य सेवेकडे यायला तयार नाहीत. त्यांची मानसिकता आता वेगळी झाली असून त्यांच्यातील समाजाप्रती कर्तव्यभावना संपली आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवीनंतर बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण देऊन थेट सेवेत घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागच या विभागाला डॉक्टर पुरवेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शेंडा पार्क येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या निमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुजित मिणचेकर होते. यावेळीप्रमुख उपस्थिती आ. राजेश क्षीरसागर, आ. प्रकाश आबिटकर, राज्याचे आरोग्य सेवा संचालक सतीश पवार, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी. जे. शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी.आरसुळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे यांची होती.डॉ. सावंत म्हणाले, डॉक्टरांची मानसिकता वेगळी झाली आहे. ज्या शासनाच्या माध्यमातून आपण शिकलो व प्रगल्भ झालो. त्याची उतराई करण्याची भावना डॉक्टरांमध्ये दिसत नाही. त्यांची मानसिकता घातलेले पैसे वसूल होण्यासाठी नको ते मार्ग स्वीकारण्याची असून त्याला पालकांचीही संमती आहे. याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आता पुढाकार घेऊन जनजागृती करावी.आरोग्य विभागातील रिक्त पदांची गळचेपी झाली आहे. एमबीबीएस डॉक्टर इकडे यायला तयार नाहीत. त्यावर गांभीर्याने विचार करून ही पदे भरण्यासाठी वैद्यकीय पदवीनंतर बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण देऊन थेट सेवेत घेतले जाईल. त्याचबरोबर रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण असल्याबरोबरच अन्य पायाभूत सुविधा व तंत्रज्ञ असल्याशिवाय अद्ययावत मशिनरी खरेदी केली जाणार नाही.आ. मिणचेकर यांनी, तालुकास्तरावर शवविच्छेदन शीतकरण गृह उभारणे गरजेचे असल्याचे सांगितले. जेणेकरून अपघातानंतर मृतदेहांची होणारी परवड थांबेल.आ. क्षीरसागर यांनी, सीपीआर व शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुधारणा होणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली. आ. आबिटकर यांनी, शासन आरोग्यावर प्रचंड पैसा खर्च करते, पण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने त्याचा फटका सर्वांना बसत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
आरोग्य विभागच डॉक्टर पुरविणार
By admin | Published: March 02, 2015 12:16 AM