कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला. विजेचा कडकडाट इतका प्रचंड होता, की अवघे शहर दुमदुमून जात होते. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते.गेले दोन दिवस उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यात दुपारनंतर परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने दिवसभर उष्मा वाढत आहे. शनिवारी सकाळी धुके होते. त्यानंतर उन्हाचा कडाका सुरू झाला. जिल्ह्याचे कमाल तापमान ३० डिग्रीपर्यंत पोहोचल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे सायंकाळी पाऊस दणकणार हे निश्चित होते. दुपारी सव्वातीन वाजल्यापासून मेघगर्जना सुरू झाल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
पूर्वेकडून पाऊस सुरू झाला. साधारणत: पावणे चार वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाट इतका प्रचंड होता, की वीज अंगावर पडते की काय, असे वाटत होते. मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. अर्धा तास शहरात एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला.बंगालची खाडी व अंदमान-निकोबारमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सगळीकडे जोरदार पाऊस होत आहे. शुक्रवार (दि. ९)पासून चार दिवस म्हणजे उद्या, सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.