कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर; ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:07 PM2023-07-18T12:07:19+5:302023-07-18T12:07:46+5:30
पंचगंगेची पातळी १६.५ फुटांवर
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाने काहीसा जोर पकडला आहे. सोमवारी दिवसभर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून, पंचगंगेची पातळी १६.५ फुटांवर गेली आहे. ‘राजाराम’ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. रविवारी दिवसभर उघडझाप सुरू होती, मात्र रात्रीपासून पावसाने काहीसा जोर पकडला आहे. सोमवारी सकाळीही अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण ५२ टक्के, वारणा ४५, तर दूधगंगा २१ टक्के भरले आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीची पातळी सोमवारी दिवसभरात फुटाने वाढली आहे. पंचगंगा नदीवरील कसबा बावडा ते वडणगेला जोडणारा ‘राजाराम’ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर रुई, शिंगणापूर, इचलकरंजी हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. आज, मंगळवारीही जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोसळणाऱ्या सरीमुळे पाणी पाणी
सोमवारी दिवसभर अधूनमधून पाऊस झाला असला तरी सरी जोरदार होत्या. पाच-दहा मिनिटांत सगळीकडे पाणी पाणी व्हायचे.
रोप लावणीसाठी पुन्हा धांदल
मध्यंतरी दोन-तीन दिवस पावसाने उसंत घेतल्याने भाताची रोप लावणी खोळंबली होती. सोमवारी जोरदार पाऊस सुरू झाल्याने रोप लावणीसाठी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत धांदल उडाली आहे.