पावसाच्या माहेरघरातच मे महिन्यातील अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:25 AM2021-05-18T04:25:14+5:302021-05-18T04:25:14+5:30
* आजरा तालुक्याला पावसाने झोडपले आजरा : किटवडे (ता. आजरा) परिसराला रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपले. पावसाच्या ...
* आजरा तालुक्याला पावसाने झोडपले
आजरा :
किटवडे (ता. आजरा) परिसराला रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपले. पावसाच्या माहेरघरातच मे महिन्यात अतिवृष्टीपेक्षा जास्त म्हणजेच २८० मिलिमीटर पाऊस झाला आहे. किटवडे व आंबाडे बंधाऱ्यानजीक नदीचे पाणी शेतात घुसले तर आंबाडे बंधाऱ्याजवळील रस्ता अतिवृष्टीने वाहून गेला आहे. पावसाने हिरण्यकेशी नदीवरील १०० ते ११० विद्युत पंप पाण्याखाली गेल्याने २५ ते ३० लाखांवर नुकसान झाले आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आजरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काल दिवसभर व रात्री पडलेल्या अतिवृष्टीपेक्षा जास्त पावसाने हिरण्यकेशी नदी रात्रीपासूनच पात्राबाहेरून वाहत आहे. किटवडे बंधाऱ्याचे ११० पैकी ४० बरगे ४ मे रोजी सोहाळे बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यासाठी काढले होते. तरीही रात्री पडलेल्या अतिवृष्टीपेक्षा जास्त पावसाने बंधाऱ्याजवळ पाणी शेतात घुसले.
किटवडे व अंबाडे बंधाऱ्यानजीक हिरण्यकेशी नदीने पात्र बदलून शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. हिरण्यकेशी नदीवरील शेतकºयांची जवळपास १०० ते ११० विद्युत पंप पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. आज दिवसभर हिरण्यकेशी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने कांही ठिकाणचा ऊसही मोडून पडला आहे. सकाळपासून पाऊस कमी झाल्याने दुपारनंतर नदीचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.
अतिवृष्टीच्या पावसाने तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. सर्वच बंधाऱ्यावरून पाणी खाली आल्याने हिरण्यकेशी नदी पावसाळ्याप्रमाणे दुथडी भरून वाहत आहे.
पावसाने अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप, पाईपलाईन, जनावरांचा चारा व मेसकाठीही वाहून गेली आहे. किटवडे व आंबाडेजवळ नदीचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे. आजराचे तहसीलदार विकास अहिर, पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी आर. एन. मलगेकर, तलाठी महादेव देसाई यांनी नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली.
-----------------------
*
बंधाऱ्याचे बरगे उद्यापासून काढणार
प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या अखेरीस हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्याचे बरगे काढले जातात. चालू वर्षी २० तारखेपासून बरगे काढण्याचे नियोजन केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे मंजूर मिळण्यास अडचण होती. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सर्व बंधारे तुडुंब झाले आहेत. बंधाऱ्यांना धोका होवू नये म्हणून उद्यापासून बरगे काढले जाणार आहेत, अशी माहिती शाखाधिकारी आर. एल. मळगेकर यांनी दिली.
-------------------------
* आजऱ्यांजळील रामतीर्थचा धबधबा प्रवाहित
अतिवृष्टीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आज आजऱ्याजवळील रामतीर्थ धबधबा प्रवाहित झाला आहे. आज दिवसभर रामतीर्थ धबधबा व व्हिक्टोरिया पुलावरून पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
--------------------------
*
मे महिन्यातच हिरण्यकेशी तुडुंब भरून वाहते
आजरा तालुका म्हणजे पावसाचे माहेरघर आहे. प्रतिवर्षी १० जूनपासून पावसाला सुरुवात होते. मात्र दोन दिवसापूर्वी अरबी समुद्रातील वादळामुळे अतिवृष्टीपेक्षा जास्त पडलेल्या पावसाने हिरण्यकेशी नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे मेअखेरीला पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई चालूवर्षी भासणार नाही.
फोटो ओळी १) अतिवृष्टीच्या पावसाने आजरा तालुक्यातील आंबाडे बंधाऱ्याजवळ तुटलेला रस्ता.
क्रमांक : १७०५२०२१-गड-०५
२) किटवडे बंधाऱ्याजवळ उसाच्या शेतात घुसलेले पाणी.
क्रमांक : १७०५२०२१-गड-०६
३) देवर्डे बंधाऱ्यानजीक विद्युत पंपात घुसलेले नदीचे पाणी.
क्रमांक : १७०५२०२१-गड-०७
४) हिरण्यकेशी नदीवरील प्रवाहित झालेला रामतीर्थ धबधबा.
क्रमांक : १७०५२०२१-गड-०८
५) आजऱ्याजवळ दुथडी भरुन वाहणारी हिरण्यकेशी नदी.
क्रमांक : १७०५२०२१-गड-०९