‘त्या’ अपघातग्रस्त तरूणाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:35+5:302021-04-15T04:24:35+5:30
नेसरी : वर्षभरापूर्वी हरळी (ता. गडहिंग्लज) जवळ झालेल्या दुचाकी अपघातात पाठीचा मणका मोडलेल्या मंगेश गुरव या तरुणाच्या मदतीसाठी ...
नेसरी : वर्षभरापूर्वी हरळी (ता. गडहिंग्लज) जवळ झालेल्या दुचाकी अपघातात पाठीचा मणका मोडलेल्या मंगेश गुरव या तरुणाच्या मदतीसाठी एस. एस. हायस्कूल, नेसरीच्या १९९०च्या वर्गमित्रांनी ११ हजार रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
सामाजिक कार्य समितीचे सदस्य अनिल देसाई यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी बापूसाहेब घवाळे, अनिल देसाई, दिलीप पाटील, मुरलीधर कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. विजय गुरबे यांनी स्वागत केले. अमोल बागडी यांनी आभार मानले. सामाजिक कार्य समितीचे सदस्य गुलाबराव पाटील, बाळासाहेब नावलगी, आप्पासाहेब कुंभार, सुरेश गवळी, सतीश खराबे, अभिजीत कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे येथील संतोष नौकुडकर, सुनील मगर यांच्यासह दिलीप पाटील, उमेश दळवी, बाळू वांजोळे व १९९०च्या एस. एस. हायस्कूलचे दहावीचे वर्गमित्र आदींच्या दातृत्वातून ही रक्कम जमा झाली आहे. ‘लोकमत’ने २७ मार्च रोजी ‘‘बिद्रेवाडी’च्या गुरवला हवी मदत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून वर्षभर अंथरुणावर असलेल्या गरीब मंगेशच्या अपघातामुळे झालेल्या परिस्थितीची व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत या गरीब तरूणाला मदत मिळत आहे.
दरम्यान, याच कार्यक्रमात येथील अनिल देसाई यांनी दोन हजार, निवृत्त शिक्षक बापूसाहेब घवाळे यांनी पाच हजार रुपयांची मदत करून एकूण १८ हजार रुपये मंगेशच्या खात्यावर वर्ग केले. पीडित मंगेशच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार आहे. त्यासाठी सेवाभावी संस्था व व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोगनोळी येथील सेवाभावी कार्यकर्ते सुनील आबदागिरी व नेसरी येथील गुलाबराव पाटील व रवींद्र हिडदुगी हे मंगेशच्या शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न करत आहेत.