अरे हसनू... मंगळवार-बुधवार मी जाणार नाही बघ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:26 AM2019-01-12T00:26:41+5:302019-01-12T00:28:15+5:30

‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत.

Hey Hasanu ... Tuesday-Wednesday I will not see ...! | अरे हसनू... मंगळवार-बुधवार मी जाणार नाही बघ...!

अरे हसनू... मंगळवार-बुधवार मी जाणार नाही बघ...!

Next
ठळक मुद्देसकिनाबी मुश्रीफ यांचा शब्द खरा : आईच्या निधनानंतर गहिवरले हसन मुश्रीफकौटुंबिक, राजकीय जीवनातील आधार हरपला

कोल्हापूर : ‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत. शुक्रवारी त्यांनी हा शब्द खरा करून दाखविला व हसन मुश्रीफ जवळ असतानाच, वयाच्या ९२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

आईच्या निधनानंतर मुश्रीफ त्यांच्या आठवणींनी गहिवरून गेले. तसे मुश्रीफ हे कागलमधील सधन शेतकरी कुटुंब; पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मुश्रीफ यांचे वडील हे मराठमोळे व्यक्तिमत्त्व. फेटा बांधलेला त्यांचा फोटो आजही त्यांच्या घरी पाहायला मिळाला. साऱ्या गल्लीचे ते ‘बापूजी’ होते. कागलचे ते पहिले उपनगराध्यक्ष.

सुमारे ५० वर्षांपूर्वी स्वत:ची मोटारकार दिमतीला बाळगणारे हे कुटुंब. हसन मुश्रीफ वीस-बावीस वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्याला आज ४६ वर्षे झाली; परंतु वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आईने हसन, शमशुद्दीन व अन्वर हे भाऊ व तीन बहिणी यांचा सांभाळ केला, त्यांचे आयुष्य घडविले. त्या करारी बाण्याच्या होत्या. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांना चांगली स्मृती होती. त्या आयुष्य अत्यंत शिस्तबद्धपणे जगल्या. मुश्रीफ सांगत होते की, त्यांनी कधीही औषधाची गोळी चुकविली नाही. एखादी गोळी डॉक्टरांच्या पुडीत जास्त आली तरी त्या ‘ही माझी गोळी नव्हे,’ म्हणून आठवण करून द्यायच्या.

गैबी चौकातील जुन्या घरात त्या राहत होत्या. मागील बाजूस हसन मुश्रीफ राहायचे. अनेक वर्षे ते मंत्री राहिल्याने मंगळवार-बुधवार ते हमखास मुंबईला असतात; त्यामुळे ‘तू नसताना मी कधी मरणार नाही बघ,’ असे त्या हसत-हसत म्हणायच्या. शुक्रवारी त्यांच्या मृत्यूनंतर ही आठवण सांगताना मुश्रीफ यांचेही डोळे भरून आले. जुन्या घरात जिथे त्यांची बेडरूम आहे, तेथूनच मुश्रीफ यांच्या बंगल्याकडे रस्ता जातो. त्यामुळे ज्या दिवशी मोटारसायकलींची वर्दळ कमी असेल, त्या दिवशी ‘आज हसनू घरात नाही,’ असा त्यांचा ठोकताळा असे. मुश्रीफ यांना राजकीय व कौटुंबिक जीवनातही आईचा खूप मोठा आधार होता. घरातून बाहेर पडल्यानंतर पाच मिनिटे आईजवळ बसल्याशिवाय गाडीत बसायचे नाही, हा शिरस्ता त्यांच्याकडून कधीच चुकला नाही. प्रत्येक निवडणुकीवेळी ते उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांचा आशीर्वाद घेत. ‘तू निवडून येतोस’ असा त्यांचा आशीर्वाद असे. त्या प्रचारात किंवा राजकीय गोष्टींत फारशा नसायच्या; परंतु गल्लीतील सर्वांना घेऊन त्या मतदानाला मात्र आवर्जून जात असत. सत्ता, पद असेल-नसेल; परंतु तू लोकसेवेला कधी अंतर देऊ नको, असे त्यांचे सांगणे असे.

आनंदाचा घडा रिता...
तिन्ही भावांपैकी हसन मुश्रीफ यांचा स्वभाव, शारीरिक ठेवण सारे कसे आईसारखे. त्यामुळे ‘मी आईच्या वळणावर गेलोय,’ असे ते अभिमानाने सांगत. मुलाने वडिलांचे नाव केले, याचाही त्यांच्या आईला आनंद वाटे. त्या साºया आनंदाचा घडा आज रिता झाला... कायमचाच...!!

Web Title: Hey Hasanu ... Tuesday-Wednesday I will not see ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.