कोल्हापूर : पर्यावरणाची हानी टाळत विधायक होळी साजरी करण्याकडे शहरातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा ओढा वाढत चालला असून गुरुवारी साजरी झालेल्या होळीच्या निमित्ताने काही मंडळांनी येथील पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभुमीस १ लाख ८० हजार शेणी दान केल्या तर सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान केल्या जाणार आहेत. दिवसे दिवस शेणी दान उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दान झालेल्या शेणींच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.पाण्याचे तसेच हवेचे प्रदुषण टाळले जावे म्हणून कोल्हापूर परिसरात गेल्या काही वर्षापासून एक सामाजिक चळवळ सुरु झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकेकाळी गणपती मूर्ती दान उपक्रमास विरोध होत होता, परंतु जसे पाण्याच्या प्रदुषणाचे महत्व पटायला लागले तसे नागरीकांकडूनच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळायला लागला.
होळीच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. होळीमुळे सार्वजनिक रस्ते खराब होत असत शिवाय हवेचेही मोठ्या प्रमाणात प्रदुषण होऊ लागले आहे. या गोष्टीचेही महत्व पटल्यानंतर नागरीक, शहरातील मंडळांचे कार्यकर्ते होळीला जमलेल्या शेणी स्मशानभूमीस दान करु लागले.महानगरपालिका प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांचा सकारात्मक संदेश समाजात पोहचला असल्याचे स्मशानभूमीकडे दान झालेल्या शेणींच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. गुरुवारी दिवसभर शहरातील अनेक मंडळांचे कार्यकर्ते, नागरीक शेणी घेऊन स्मशानभूमीकडे जाताना दिसत होते.
एका दिवसात १ लाख ८० हजाराहून अधिक शेणी जमा झाल्याचे स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले. सानेगुरुजी परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीमार्फत रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान म्हणून दिल्या जाणार आहेत.शहरातील असंख्य मंडळांनी तसेच नागरीकांनी शेणी दान केल्या आहेत. त्यामध्ये १०० पासून ५०० पर्यंत शेणी दान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांनी किती शेणी दान केल्या यापेक्षा पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत उचललेला ‘खारीचा वाटा’ अतिशय महत्वाचा आहे. सध्या मिळत असलेला प्रतिसाद पाहता नजिकच्या काळात पर्यावरणपूरक होळी तसेच सामाजिक चळवळ म्हणून नागरीक या उपक्रमाकडे पाहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.शेणी दान करणाऱ्या मंडळांची नावे -
- - अचानक तरुण मंडळ - ५१ हजार
- - मानसिंग पाटील युवामंच - ५१ हजार
- - सम्राट फे्रंडस् सर्कल - ११ हजार १११
- - कृष्णा अंगण मित्र मंडळ - १० हजार
- - सरदार तालीम मंडळ - १० हजार
- -लक्ष्मी गल्ली तरुण मंडळ - ७ हजार
- - लक्षतिर्थ विकास फौंडेशन - ५ हजार
- -स्वप्नील लाड फौडेशन - ५ हजार
- - दिगंबर लक्ष्मण सोनटक्के - ५ हजार