कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळात वापर केलेल्या घरगुती विजेची बिले दंडव्याजासह एकदम दिल्यामुळे ती एकावेळी भरणे शक्य नाही. महावितरणच्या या एकदम बिले देण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून बुधवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जवाहरनगर, शास्त्रीनगर, राजर्षी शाहू वसाहत येथील नागरिकांनी बिलांची होळी केली.
वाय.पी. पोवारनगर येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले. एकदम बिले दिल्यामुळे सहा-सात हजार रुपयांची बिले आली आहेत. त्यामुळे ती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही; त्यामुळे बिलांचे हप्ते करून द्यावेत, दंडाची आकारणी रद्द करावी, तसेच नव्याने रीडिंग घेऊन बिले योग्य आहेत की नाहीत, याची तपासणी करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नगरसेवक नियाज खान, अमर चव्हाण, विशाल डवाळे, प्रताप डवाळे, अमोल पाटील, बॉबी पालकर, रविकिरण गवळी, आकाश औंधकर यांनी केले.