७४८ जागांसाठी होमगार्ड भरती, २० फेब्रुवारीला सदस्य नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:44 PM2019-02-09T13:44:10+5:302019-02-09T13:47:26+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रिक्त असलेल्या ५५७ पुरुष व १९१ महिला अशा एकूण ७४८ जागांसाठी होमगार्ड भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीला कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी सात वाजल्यापासून नवीन होमगार्ड सदस्य नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रिक्त असलेल्या ५५७ पुरुष व १९१ महिला अशा एकूण ७४८ जागांसाठी होमगार्ड भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीला कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानावर सकाळी सात वाजल्यापासून नवीन होमगार्ड सदस्य नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्डचे अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे.
जिल्ह्यात निवडणुका, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यांसह अनेक आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होमगार्डना कर्तव्यावर पाचारण केले जाते. होमगार्ड बंदोबस्तांकरिता हजर होत नसतील, तर त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश महासमादेशक होमगार्ड यांनी दिले आहेत. त्यानुसार संवेदनशील व अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तांवर हजर राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या होमगार्डवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
होमगार्ड गैरहजर राहिल्यामुळे बंदोबस्ताच्या मागणीप्रमाणे होमगार्डची पूर्तता होत नसल्याने जिल्ह्यातील ५५७ पुरुष व १९१ महिला होमगार्डची अनुशेष संख्या पूर्ण करण्याकरिता नवीन होतकरू उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे; त्यासाठी २० फेब्रुवारीला नवीन सदस्य नावनोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे.
उमेदवाराने गुणांक विवरणपत्र, शैक्षणिक अर्हता, रहिवासी पुरावा, कागदपत्र पडताळणी सूची, तांत्रिक गुण विवरणपत्र, निवेदन १ व २, आदी अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरून भरतीच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल. होमगार्ड नोंदणी रिक्त जागांसंबंधी बदल व नोंदणी संदर्भातील सर्व अधिकार जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सदस्य नोंदणीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक घाडगे यांनी केले आहे.