राम मगदूम
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील श्रमिक शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर गांधीवादी शिक्षणतज्ज्ञ दिवंगत माधव नारायण तथा मा. ना. कुलकर्णी यांच्या जीवनचरित्रावर आधारित 'मा. ना. एका सामान्य माणसाचा असामान्य प्रवास'या माहितीपटाची राष्ट्रीय फिल्मोत्सव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१२ जून १९६१ रोजी 'मा.ना.'नी आपल्या जन्मगावी दुंडगे येथे
परिश्रम विद्यालय ही माध्यमिक शाळा सुरू केली. लोकवर्गणीतून सुरू झालेल्या 'मूलोद्योगी शिक्षण' पद्धतीच्या या प्रशालेचा दबदबा अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रासह सीमा भागात होता.
'खेड्याकडे चला' या गांधीजींच्या संदेशानुसार सुरू झालेली ही शिक्षण पद्धती बदलत्या काळात मागे पडली; परंतु गांधी जयंतीला दरवर्षी २४ तास सूतकताईचा यज्ञ तब्बल ६० वर्षे अखंडपणे चालविणारी ही शाळा अजूनही 'मा.ना.'ची शाळा म्हणूनच ओळखली जाते.
या शाळेचे माजी विद्यार्थी सोमदत्त देसाई यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. त्यात 'मा.नां.'चे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, गांधी तत्त्वज्ञानावरील शिक्षणाचे यशापयश व सद्य:स्थिती यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या नोएडा येथील " विज्ञान प्रसार" संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय विज्ञान माहितीपट स्पर्धेतील स्वतंत्रता का विज्ञान फिल्मोत्सवामध्ये सादरीकरण व स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
त्याचे संपूर्ण चित्रीकरण संकेश्वर येथील प्रसिद्ध युवा छायाचित्रकार कालवश संकेत मन्नाई आणि त्याचा सहकारी अक्षय बंदी यांनी केले आहे. पुण्याचे चेतन अरुण यांनी संकलन, तर सोमदत्तचे वर्गमित्र विक्रम, अवधूत, रोहित व पुष्पक यांनी याकामी विशेष मदत केली आहे.
-------
चौकट
१३-१५ ऑगस्टदरम्यान सादरीकरण
हे फिल्म फेस्टिव्हल म्हणजे
केंद्र सरकारच्या 'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग आहे.
त्यासाठी निवड झालेल्या माहितीपटांचे सादरीकरण
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'विज्ञान प्रसार' च्या यूट्युब चॅनेलवर होणार आहे.