घोडे बाजारला लगाम लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:28 AM2021-09-24T04:28:05+5:302021-09-24T04:28:05+5:30
कोल्हापूर : नगरपालिकेत द्विसदस्यीय आणि महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग रचनेच्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेची प्रभाग रचना जैसे थे राहील; ...
कोल्हापूर : नगरपालिकेत द्विसदस्यीय आणि महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग रचनेच्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेची प्रभाग रचना जैसे थे राहील; पण महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग संख्या बदलून ८१ वरून २७ प्रभाग होतील. या नव्या निर्णयामुळे पक्षीय राजकारणाला बळ मिळणार असल्याने घोडेबाजार, फोडाफोडीच्या राजकारणाला लगाम लागेल, असे मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
नगरपालिकेत यापूर्वीची निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेत एका प्रभागात दोन नगरसेवक आहेत. सरकारच्या आताच्या निर्णयामुळेही असेच राहणार आहे. नगरपालिकांमध्येही एकेका प्रभागातील मतदारांची संख्या वाढणार आहे. नगरपालिकेत एका प्रभागात दोन असतील. यामुळे पैसे आणि विविध आमिषे दाखवून मते मॅनेज करण्याचे प्रमाण कमी होणार आहे. अपक्षांची निवडून येण्यासाठीची ताकद पोहोचणार नाही. याचा फायदा पक्षीय संपर्क, ताकद असणाऱ्या उमेदवाराला होणार आहे; पण सामान्य कार्यकर्त्याला स्वत:च्या जनसंपर्कावर निवडून येताना दमछाक होणार आहे. परिणामी प्रभाग रचनेच्या निर्णयाचे पक्ष स्वागत करीत आहेत. याउलट अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांत चिंतेचे वातावरण आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविल्यानंतर नगरपालिका, महापालिकेच्या राजकारणात काही प्रमाणात का असेना घोडेबाजार, फोडाफोडीच्या राजकारणाला चाप बसणार आहे.