कोल्हापूर : कोविड जेएन-१ या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पूर्वानुभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील कोविडसंबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजू निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले. आता नव्याने व्हेरियंटवरही मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्रिसूत्रींचे पालन करावे.
‘कोविड व्हेरियंट जेएन-१’च्या अनुषंगाने रुग्णालयांनी यंत्रणा सज्ज ठेवावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 12:05 PM