कोल्हापूर : ढिसाळ नियोजन, साेशल डिस्टन्सिंगचा अभाव, पहाटेपासून ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक, वादावादीचे उद्भवणारे प्रसंग, लस घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा ही स्थिती आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी ग्रामीण आरोग्य केंद्रावरची. या गर्दीमुळे आरोग्य केंद्रेच कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याची शक्यता आहे.
हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी लोकं पहाटेपासून येऊन बसतात. मत्रा, प्रत्यक्षात अकरा वाजता लस आल्यानंतर पुढील तारीख समजते. त्यामुळे वादाचे प्रसंग वाढत आहेत. लस कोणत्या तारखेपासून पुढे देणार आहेत, पहिला डोस घेउन किती आठवडे झाले आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांना पुढची तारीख दिली जाते. मात्र, तो पर्यंत हे जेष्ठ नागरिक पहाटेपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता ताटकळत तेथे बसत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचे ढिसाळ नियोजन दिसत आहेत. यामुळे अनेकवेळा वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत.
पहिली लस घेतलेल्या सर्व नागरिकांची माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने ज्यांचा दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांनी येणार आहे, त्यांच्या तारखा आरोग्य यंत्रणा आधीच जाहीर करु शकते, शिवाय त्यांच्या नावाची प्रिंट काढून बाहेर प्रदर्शित करु शकतात. यामुळे ज्यांचे संबंधित तारखेला लस घेण्याचा दिवस असेल असेच शंभर नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर येउ शकतील अशी व्यवस्था लावणे गरजेचे आहे.
याशिवाय या केंद्रावर डोस किती शिल्लक आहेत तसेच पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची आकडेवारी केेंद्राबाहेर लावता येईल. याशिवाय कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत डोस दिला जाईल हे जाहीर केल्यास विनाकारण गर्दी होणार नाही. डोस किती आले याचे नियोजन करून दुसऱ्या दिवशी तेवढ्याच लोकांशी संपर्क साधून बोलावता येईल. आरोग्य विभागाकडे नियोजन लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.