लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीतील प्रचारात केलेल्या आराेपाबाबत जिल्हा न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा सुरू आहे. त्याच्या निकालानंतर त्यांची सगळी संपत्ती विकून भरतात की काय, हे बघू. मात्र त्यांची माया कोठे आहे, याची आपणास माहिती असल्याचा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. सटवीने लिहिल्याप्रमाणेच माणसाच्या आयुष्यात होत असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याची स्वप्ने बघू नयेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अनुकरण करावे, असा टाेलाही त्यांनी लगावला.
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, हा आभास असल्याची टीका केल्याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुंबईचे आयुक्त चहल यांनी चांगले व्यवस्थापन करून कोरोना रोखण्यात यश मिळविले. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. मग न्यायालय व मोदी हे आभास आहेत का? फडणवीस यांनी राजकारण करत बसण्यापेक्षा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे अनुकरण करावे. सटवीने लिहिले त्यानुसारच होते, सारखे पुन्हा येईन... पुन्हा येईन... म्हणून कोणी सत्तेवर येत नसते. चुकीच्या आरोपामुळे गेले दीड वर्ष काम करणारी आराेग्य व पाेलीस यंत्रणा नाउमेद होते, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
प्रसिध्दीसाठीच आवाडे बोलत असावेत
हातकणंगले, शिरोळ तालुक्यांची जबाबदारी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कागल, गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यांची आपल्यावर, तर उर्वरित तालुक्यांची पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर जबाबदारी आहे. इचलकरंजीमध्ये नक्की काय झाले, हे पाहतो. कदाचित प्रसिध्दीसाठीच आमदार प्रकाश आवाडे हे बोलले असावेत, असा टोलाही मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.