इचलकरंजी : शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य मार्गावरील चौकात बंदोबस्त तैनात केला आहे; परंतु काही महाभाग त्यांना चकवा देत इतर मार्गाने शहरात संचार करत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून सुरू आहे.
इचलकरंजीत मोटारसायकलस्वार सुसाट
इचलकरंजी : येथील नगरपालिका प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात जनता कर्फ्यू पुकारला आहे. दुपारनंतर रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू आहे. रस्ते निर्मनुष्य असल्यामुळे तरुण मोटारसायकलवरून सुसाट वेगाने फिरताना दिसत आहेत. वाहतूक कमी असली तरी अपघात होण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुसाट वेगाने फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
इलेक्ट्रिकल खांब रस्त्याकडेला बसवावेत
इचलकरंजी : कलानगर ते चंदूर रोड या मार्गावरील मुख्य रस्त्यावर मध्ये असलेले इलेक्ट्रिकल खांब काढून रस्त्याच्या कडेला बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सारण गटारीचे काम पूर्ण झाले असून, इलेक्ट्रिकल खांबामुळे रस्त्याचे काम व रूंदीकरण रखडले आहे. याकडे ताबडतोब लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
इंगळी : येथे विनामास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांवर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्रामसेवक बजरंग सूर्यवंशी यांनी मुख्य रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या दहा जणांकडून दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला.