इचलकरंजी पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:28 AM2021-09-14T04:28:07+5:302021-09-14T04:28:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेने कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्यातील पगार न दिल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेने कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्यातील पगार न दिल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. पालिकेने भेदभाव केल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये उमटली होती. याबाबत तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. कर्मचाऱ्यांना त्वरित पगार न मिळाल्यास आज, मंगळवारपासून सर्व कर्मचारी काम बंद करतील, असा इशारा दिला.
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनुसार पालिकेच्या राखीव निधीतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी सहा कोटी रुपये काढण्यात आले. यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. राखीव निधीतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवली जातात. मात्र, जे कर्मचारी कामावर रुजू आहेत, त्यांना डावलले जात आहे. पालिकेस कर्मचाऱ्यांचा पगार भागविण्यासाठी राज्य शासनाकडून सहायक अनुदान मिळते. परंतु सध्या पालिका आर्थिक अडचणीत असून, तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह अन्य देणी देण्यास पालिकेच्या नाकीनऊ येत आहेत.
पालिकेने ऑगस्ट महिन्यात प्राप्त झालेल्या ६ कोटी ५८ लाख रुपये अनुदानातून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे दोन कोटी ८७ लाख, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे २ कोटी ३८ लाख रुपये भागविले. अ, ब व क श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे जवळपास १ कोटी १५ लाख रुपये देणे आहे, यासाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.