अतुल आंबीइचलकरंजी : शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच्यादृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यातच या खून प्रकरणात ऐन उमेदीतले तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.शहर परिसरात विविध गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सेफ सिटीअंतर्गत शहरात सर्वत्र सीसीटीव्ही असतानाही गंभीर गुन्हे घडत आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे सलग चार महिन्यांत आठ खुनांच्या घटना घडल्या. कबनूर (ता.हातकणंगले) येथे राजकीय वादातून संदीप मागाडे, शहापूर येथे शुभम कुडाळकर, एका ३५ वर्षीय तरुणाचा खून करून शहापूर खणीत टाकण्यात आले. त्याचा अद्याप मागमूस नाही. त्यापाठोपाठ कोरोची माळावर व शांतीनगर परिसरात झालेले दोन्ही खून तरुणांचेच. विशेष म्हणजे या सर्व खून प्रकरणात गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी हे सर्वजण ऐन उमेदीतीतले तरुणच आहेत.या घटनांकडे गांभीर्याने पाहिल्यास खुनशी स्टेट्स ठेवणे, चैनी, नशा अशा प्रमुख कारणांतून खून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुणाई भरकटत आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. शहरातील अनेक मातब्बर गुन्हेगार मोक्कांतर्गत कारागृहात आहेत. त्यामुळे खुनाचा बदला घेण्यासाठी खून, खंडणीसाठी खून असे प्रकार थांबले असले तरी किरकोळ तात्विक कारणातून सहजपणे खून केले जातात.शांतीनगर येथील अजित कांबळे याचा खून दारू पिण्यासाठी व चैनीसाठीच्या किरकोळ पैशांसाठी केल्याचे उघडकीस आले आहे. तर खोतवाडी येथील खूनही सायकल चोरीच्या संशयावरून झाला. गतवर्षी कोरोची (ता.हातकणंगले) येथे दारू पिताना वाद होवून खून झाला. त्यात आईने दारूड्या मुलाच्या डोक्यात खलबत्ता घालून खून केला. क्षुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत मानसिकता पोहचत आहे. ही खेदजनक व चिंताजनक बाब आहे.
ठोस पावले उचलावीतनूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. परंतु खुनासारख्या गंभीर घटना थांबता थांबेनात. त्यातच घरात घुसून वृद्धेला लुबाडणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, नशेचे पदार्थ विक्री, गुटखा विक्री असे प्रकार वारंवार घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिस दलाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.