विश्वास पाटील
कोल्हापूर : कर्नाटकात काँग्रेसने ओबीसींचे २७ टक्के आरक्षण मुस्लिमांना बहाल केले. देशात त्यांची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण ते धर्माच्या नावांवर वाटल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे झालेल्या सभेत केला.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांची सभा झाली. त्यांनी २९ मिनिटांच्या भाषणात काँग्रेससह इंडिया आघाडीच्या धोरणांवर सडकून टीका केली. केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास काश्मीरमधील ३७० कलम ते पुन्हा आणतील, सीएए कायदाही रद्द केला जाईल, तो तुम्ही करू देणार आहात का, अशी विचारणा त्यांनी जनसमुदायाला केली.
पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसने कर्नाटकात एससी, एसटी, ओबीसींचे २७ टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्यासाठी त्यांनी एका रात्रीत आदेश काढला. देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर ते हाच फॉर्म्युला देशात लागू करतील.
एनडीए २-० ने पुढे
कोल्हापूर हे महाराष्ट्राचे फुटबॉल हब असून त्याच भाषेत सांगायचे झाल्यास, एनडीए दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर २-० ने पुढे आहे. पुढच्या टप्प्यामध्येही तुम्ही असा जोरदार गोल माराल की इंडिया आघाडीवाले चारीमुंड्या चितपट होतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
पुन्हा 'नकली शिवसेना'
उद्धवसेनेचा उल्लेख पंतप्रधानांनी पुन्हा 'नकली शिवसेना' असा केला. ते म्हणाले, आजचे ते काँग्रेससोबत राज्यात राजकारण करत आहेत, हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आल्याला यातना होत असतील.