कोल्हापूर , दि. २७ : कोल्हापुरातील विमानसेवा सुरू होण्यामध्ये एक एक दिवसाचा जो विलंब होत आहे, त्यातून जिल्ह्याचे होणारे नुकसान पाहता व लोकभावना लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व त्रुटी तत्काळ पूर्ण करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे दिल्या.
नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या उपसंचालिका सुब्रता सक्सेना, सहायक संचालक मुकेश वर्मा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक एस. एस. बालन, उपसरव्यवस्थापक कृष्णकुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, कोल्हापूर विमानतळाच्या पूजा मालू यांच्या पथकाने पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यामध्ये विमानसेवा नियमित सुरू होण्यामध्ये येत असलेल्या अडचणींचा व त्यावरील करण्यात येणाºया उपाययोजनांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला.
कोल्हापूरची विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यादृष्टीने ‘कंडिशनल लायसन्स’ (अटी व शर्थी घालून परवाने) द्या. त्यामुळे त्रुटी दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील, असे सांगून मंत्री पाटील यांनी विमानसेवा सुरू करण्यामध्ये कोणत्याच मोठ्या अडचणी नाहीत. सुरक्षिततेच्यादृष्टीने ज्या बाबी असतील त्या कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे सांगितले.
यामध्ये विमानतळाची इमारत, एक किलो मीटरची वाढीव धावपट्टी, टॉवर, आदी सर्व अनुषंगिक बाबींवर चर्चा झाली. कोल्हापूरमध्ये नियमित विमानसेवा सुरू होणे ही कोल्हापूरमधील औद्योगिक व अन्य घटकांसाठी अत्यावश्यक बाब असून, जवळपास सहा ते सात वर्षांपासून बंद असलेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे.
अनेक नवीन उद्योग, मोठे प्रकल्प कोल्हापूरमध्ये विमानसेवा नसल्याने येऊ शकले नाहीत. याचा जिल्ह्याच्या विकासावरही परिणाम झाला आहे. विमानसेवा लवकरात लवकर सुरू झाल्यावर त्याचे परिणाम सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये लवकरात लवकर दिसून येतील. त्यामुळे ही विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. त्यासाठी असणाऱ्या त्रुटी प्रशासनाने प्राधान्याने सोडवाव्यात, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.