कोल्हापूर : शहरातील गुजरी या सराफ बाजारपेठेत आयकर विभागाने सुमारे तीन प्रमुख सराफ व्यापाऱ्यांच्या शोरूम, कारखाने व निवासस्थानी अचानक छापे टाकले. या कारवाईने खळबळ माजली आहे. आयकर विभागाच्या पुणे आणि कोल्हापूर शाखेच्या चार पथकांनी बुधवारी ही संयुक्तपणे कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे तपासणीचे काम सुरू होते. कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेतील काही सराफ हे आयकर खात्याच्या हिटलिस्टवर होते. त्याबाबत काही व्यापाऱ्यांच्या रोजच्या उलाढालीबाबत सराफ बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चर्चा होती. गुजरी व आझाद गल्ली परिसरात आयकर विभागाच्या पथकाने हे छापे टाकले. आझाद गल्लीतील सोन्याच्या मण्यांचे होलसेल व्यापारी, तर गुजरीतील सोन्याचे होलसेल व रिटेल व्यापारी, तसेच चांदी मालाचा होलसेल व्यापार करणाऱ्या सराफ व्यावसायिकांवर हे छापे टाकण्यात आले. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आयकर विभागाची कोल्हापूर आणि पुणे शाखेची चार पथके वाहनांच्या ताफ्यासह अचानक दाखल झाली. त्यांनी गुजरी परिसरातील खर्डेकर बोळातील होलसेल चांदीमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शोरूमवर तसेच त्यांच्या चांदीचे दागिने उत्पादन करणाऱ्या आझाद गल्लीतील कारखान्यावर व निवासस्थानावर छापा टाकला. तसेच त्यांच्या चार भावांच्या व्यवसायावरही छापा टाकला. त्याचवेळी गुजरी कॉर्नर येथील सोन्याचे प्रसिद्ध होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांच्या शोरूम आणि निवासस्थानावर छापा टाकला, तर आझाद गल्ली येथील सोन्याचे मणी होलसेल व्यापाऱ्याच्या दुकान आणि निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला. या तीन व्यापाऱ्यांचे शोरूम, कारखाने, निवासस्थानांवर एकाचवेळी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या तिन्हीही व्यापाऱ्यांच्या काही निकटवर्तीयांची सायंकाळनंतर चौकशी सुरू केली. या कारवाईत कागदपत्रांची छाननी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने आयकर विभागाच्या चार पथकांतील कर्मचाऱ्यांनी ही छाप्याची कारवाई केली. (प्रतिनिधी)
गुजरीत आयकरचे बड्या तीन सराफांवर छापे
By admin | Published: September 22, 2016 12:50 AM