सुधारित : आंबेवाडीनजीक दोन अपघातात १ ठार, तर पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:28+5:302021-03-06T04:24:28+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी (ता. करवीर) नजीक शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या मोटार अपघातांत एकाचा मृत्यू, तर पाचजण गंभीर ...
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी (ता. करवीर) नजीक शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या मोटार अपघातांत एकाचा मृत्यू, तर पाचजण गंभीर जखमी झाले. टेम्पोच्या धडकेत पाटबंधारे विभागाचे निरीक्षक राहुलराज अनिल पाटील (वय ३२, रा. पुलाची शिरोली) हे जागीच ठार झाले, तर सायंकाळी दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन महिलांसह पाचजण जखमी झाले.
कोल्हापूर ते आंबेवाडी मार्गावर शुक्रवार हा अपघातांचा वार ठरला. पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे राहुलराज पाटील हे सकाळी साडेदहाच्यासुमारास आपल्या मोटारीतून कामानिमित्त शाहूवाडीला निघाले होते. आंबेवाडीपासून काही अंतरावर असणाऱ्या रेडेडोहनजीक भरधाव मालवाहतुकीच्या टेम्पोची आणि त्यांच्या मोटारीची धडक झाली. यामध्ये राहुलराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सुनील केशव फडतरे (रा. वालूर, शाहूवाडी) याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकट
सायंकाळी दुसरा अपघात
सकाळी आंबेवाडी येथे मोठा अपघात झाला असतानच दुपारी चारच्यासुमारास वडणगे फाटा ते आंबेवाडी गावादरम्यान दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन आणखी एक अपघात झाला. यामध्ये संदीप सर्जेराव फाळके (वय ४२), सुनंदा सर्जेराव फाळके (६१, रा. सानेगुरुजी वसाहत) व प्राजक्ता रंगराव फाळके (२१, रा. बांबवडे) जखमी झाल्या. फाळके कुटुंबीय भेडसगावहून कोल्हापूर शहरात येत होते, तर जोतिबा दर्शनासाठी जाणाऱ्या मोटारीची व त्यांची धडक झाली. दुसर्या मोटारीचा चालक जनार्दन महादेव सणगर व विजय परब या दोघा जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
फोटो : ०५०३२०२१ कोल राहुलराज पाटील निधन