कोल्हापुरात शेकडो युवकांनी केली शाहू विचार दर्शन पदयात्रा
By संदीप आडनाईक | Published: April 28, 2024 08:58 PM2024-04-28T20:58:25+5:302024-04-28T20:58:46+5:30
यात्रामार्गामध्ये सहभागी मावळ्यांच्या, शिव-शाहूंच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला होता. शाहू विचारांचे आणि त्यांच्या कार्यांचे फलक यासह वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांच्या माहितीच्या फलकांनी साऱ्यांनी लक्ष वेधून घेतले.
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा जागर करण्यासाठी मावळा कोल्हापूर फाउंडेशनमार्फत रविवारी कोल्हापुरातून निघालेल्या शाहू विचार दर्शन पदयात्रेत शेकडो युवक सहभागी झाले. यात्रामार्गामध्ये सहभागी मावळ्यांच्या, शिव-शाहूंच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला होता. शाहू विचारांचे आणि त्यांच्या कार्यांचे फलक यासह वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांच्या माहितीच्या फलकांनी साऱ्यांनी लक्ष वेधून घेतले.
शाहू जन्मस्थळावर प्रज्वलित केलेली ‘शाहू विचार ज्योत’ दिगंबर जैन बोर्डिंग येथे आणण्यात आली. तेथील मशाल शाहू विचार ज्योतीने प्रज्वलित करून सकाळी ७:३० वाजता या पदयात्रेस प्रारंभ झाला. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, सारस्वत बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, सबनिस बोर्डिंग, मुस्लीम बोर्डिंग, पांचाळ बोर्डिंग, मिसक्लार्क हॉस्टेल, शाहू वैदिक स्कूल, इंदुमती बोर्डिंग, देवल क्लब, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, गुरुमहाराज वाडा, दैवज्ञ बोर्डिंग, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, सुतार बोर्डिंग, नाभिक बोर्डिंग, वैश्य बोर्डिंग, देवांग कोष्टी बोर्डिंग, आर्य क्षत्रिय बोर्डिंग, गंगावेश तालीम, सत्यशोधक समाज, नामदेव शिंपी बोर्डिंग, गंगाराम कांबळे स्मृतिस्तंभ या शाहू स्थळांच्या भेटीनंतर यात्रेची सांगता शाहू स्मृतिस्थळावर झाली. राजर्षी शाहूंच्या समाधीला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृहांमुळे ज्ञानाचा प्रकाश बहुजन समाजामध्ये पसरला. त्यांचे पुनरुज्जीवन करून शिक्षण प्रसाराचे काम बहुजन समाजाने केले पाहिजे.
या पदयात्रेत मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश पोवार, रोहित आर. पाटील, यशस्विनीराजे छत्रपती, आपचे संदीप देसाई, सरलाताई पाटील, भारती पोवार, शिवराज नायकवडे, संदीप सूर्यवंशी, संदीप पाटील, शाहीर रंगराव पाटील, शाहीर दिलीप सावंत, रवी जाधव, आशितोष खराडे, देवेंद्र डांगोळे, संताजी भोसले, अमोल निकम, अमर सासणे, योगेश मांगोरे, विक्रम भोसले, अरुण सावंत सहभागी झाले होते.