कागल : कोणतेही मोठे पद नसताना समरजित घाटगे मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. राजे म्हणून त्यांच्या शब्दाला शासन दरबारी मान आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकात ज्या काही चार दोन हाय व्होल्टेज लढती होतील, त्यामध्ये कागल आहे. येथे लढत मोठी आहे; पण ती आता आपल्यासाठी सोपीही झाली आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात आयोजित केला होता. तेव्हा महाडिक बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे प्रमुख उपस्थितीत होते. कागलची लढत सोपी झाली आहे; पण ती कोणत्या कारणाने हे सांगणे टाळून ते तुम्हालाही माहीत आहे. जिल्ह्यात माझ्या जोडीला किमान चार आमदार हवेत. त्यामध्ये समरजित घाटगेसारखा लोकप्रतिनिधी हवा. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीने केंद्र सरकारने मंजूर केलेली कामे अडवून ठेवली, अशी टीका त्यांनी केली. यावेळी समरजित घाटगे यांचेही भाषण झाले. अमोल शिवाई यांनी स्वागत केले, तर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद गुरव यांनी प्रास्ताविक केले. सचिन शिंपुकडे, तालुकाध्यक्ष संजय पाटील बेलवळेकर, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष असीफ मुल्ला, महिला आघाडीच्या रेवती बरकाळे, विजया निंबाळकर, सुधा कदम, उत्तम पाटील, रमिज मुजावर उपस्थित होते. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.
कोल्हापूर दक्षिण व कागलचा संयुक्त मेळावासमरजित घाटगे म्हणाले की, संसदरत्न हा पुरस्कार रोटेशनने मिळत नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील. एवढेच संसदरत्न होतात. त्यासाठी संसदेत लक्षवेधी कामगिरी करावी लागते. महाडिक हे तीन वेळा संसदरत्न झाले आहेत. लवकरच कोल्हापूर दक्षिण व कागल विधानसभा मतदारसंघाचा संयुक्त मेळावा दक्षिण मध्ये घेतला जाईल.