इचलकरंजी : राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी शासनाने लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्याचा निर्णय नागपूर येथील अधिवेशनात घेतला. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या या समितीत आमदार प्रकाश आवाडे यांचा समावेश करण्यात आला आहे.गत काही वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यासाठी शासनाने विविध योजना व सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या व्यवसायातील प्रश्न ‘जैसे थे’ राहिले आहेत. त्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यावरील उपाययोजना सुचविण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे.यंत्रमाग व्यवसायातील अडचणींसंदर्भात आमदार आवाडे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर झालेल्या चर्चेत वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती गठित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार भुसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यामध्ये आमदार आवाडे यांच्यासह सुभाष देशमुख, रईस शेख, अनिल बाबर, प्रवीण दटके यांचा समावेश आहे. तर सचिव म्हणून यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राहणार आहे.
यंत्रमागधारकांच्या अभ्यास समितीत आमदार आवाडे यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 2:14 PM