गडहिंग्लज :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गडहिंग्लज विभागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संसर्गाची गती व मृत्यूदर कमी करण्यासाठी गडहिंग्लज विभागात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्याबरोबरच प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या उद्दिष्टाची वेळेत पूर्तता करा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केली.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीनंतर पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पालकमंत्री म्हणाले, गडहिंग्लजमध्ये आणखी १५०, तर चंदगडमध्ये २०० ऑक्सिजन बेडस् वाढवावेत. सर्व रुग्णांना वेळेत उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ३१ मे पर्यंतच्या उपाययोजनेचे काटेकोर नियोजन स्थानिक अधिकाऱ्यांनी करावे.
मुश्रीफ म्हणाले, सोमवारपासून (दि. २६) बांधकाम कामगार, घरेलू मोलकरीण, रिक्षावाल्यांना आर्थिक मदत व पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप सुरू होईल. गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल या चारही तालुक्यांतील सर्व अधिकाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. त्यामुळेच संक्रमणाचे प्रमाण कमी आहे. यापुढेही सर्वांनी सतर्क राहावे.
बैठकीस गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, तहसीलदार दिनेश पारगे, चंदगडचे विनोद रनावरे व आजऱ्याचे विकास अहिर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, डॉ. दिलीप आंबोळे, डॉ. मल्लिकार्जुन अथणी, डॉ. राजेंद्र खोत आदी उपस्थित होते.
-------------------------------------
* ...अन्यथा जनता कर्फ्यू !
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची क्षमता दुप्पट करण्याबरोबरच चंदगड व आजरा ग्रामीण रुग्णालयांतही ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा प्रयत्न राहील. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे; परंतु नागरिकांनीही गांभीर्याने काळजी घ्यावी. लोकांनी नियमांचे पालन न केल्यास नाईलाजाने जिल्ह्यात जनता कर्फ्यू पुकारावा लागेल, असा इशारा ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
त्या दवाखान्याला नोटीस
गडहिंग्लजमधील एका खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अधिक आहे. त्या दवाखान्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावा आणि तेथील रुग्णांच्या मृत्यूचे ऑडिट करा, असा आदेश मंत्री मश्रीफ यांनी दिला.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विजया पांगारकर, खासदार संजय मंडलिक, संपत खिलारी उपस्थित होते.
क्रमांक : २५०४२०२१-गड-०९